मुख्यमंत्री सुंदर शाळा जिल्हास्तरीय स्पर्धेत कोपर्डे शाळा द्वितीय
खंडाळा : माझी मुख्यमंत्री सुंदर शाळा या उपक्रमात खंडाळा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून कोपर्डे प्राथमिक शाळेने जिल्हयात नावलौकीक मिळवला आहे. या शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या शैक्षणिक वर्षात राज्य शासनाकडून शिक्षण विभागात ‘माझी मुख्यमंत्री सुंदर शाळा ‘ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी या शाळेत राबविल्या जाणार्या विविध उपक्रमांचे गुणदान करण्यात आले. यामध्ये शाळेची सुसज्ज इमारत , बोलक्या भिंती , बहुरंगी संरक्षक भिंत , नऊ महिने विना सुट्टीची शाळा , शिष्यवृत्तीसाठी खास मार्गदर्शन वर्ग , परसबाग , विविधांगी खेळाचे प्रात्यक्षिक , शालेय बचत बँक , विविध शैक्षणिक उपक्रम अशा वेगवेगळ्या अनुषंगाने शाळेची तपासणी करण्यात आली. यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्या पथकाने शाळेची पाहणी करून गुणांकन केले. जिल्हयातील सर्वात सुंदर शाळांमध्ये कोपर्डे शाळेला द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळाला.
शाळेच्या विविध उपक्रमांसाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. त्याला शाळा व्यवस्थापन समितीची आणि ग्रामस्थांची बहुमोल साथ मिळाली. या स्पर्धेतील विजयामुळे तालुक्याचेही नाव मोठे झाले आहे.
॥ कोपर्डे शाळेने मुख्यमंत्री सुंदर शाळेसाठी उत्तम तयारी केली होती. सर्वच उपक्रमात नेहमी या शाळेत सातत्य असते. त्यामुळे सर्व विभागात गुणांकन मिळणे सहज शक्य झाले. शाळेच्या या कामगिरीमुळे तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी उभारी मिळेल. इतर शाळांना प्रेरणा मिळाल्याने पुढील वर्षी स्पर्धेचा उत्साह वाढेल. ॥ सुजाता जाधव , गटशिक्षणाधिकारी
