बोपर्डी (ता. वाई) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात बोपर्डी ग्रामपंचायत आघाडीवर; विविध उपक्रमांनी गावात विकासाचा व स्वच्छतेचा आग्रह
बोपर्डी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत असून, फक्त दोन आठवड्यांत ग्रामविकासाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे.
अभियानांतर्गत वनराई बंधारे बांधणी, गावातील स्वच्छतेसाठी प्रति मंगळवार श्रमदान, दर आठवड्याला २०० ते ३०० वृक्षारोपण, बचतगटांची संख्या वाढविणे, अभियानाशी संबंधित अॅप डाउनलोड, प्लास्टिक संकलन व कागदी पिशव्यांचा वापर, ग्रामपंचायत कर वसुली, कार्यालयीन व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, समाजमंदिरे व देवालयांची साफसफाई, लोकवर्गणी संकलन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, रक्तदान शिबीर, सौरऊर्जा वापर जनजागृती, बंदिस्त गटार योजना, सुसज्ज स्मशानभूमी, पाणंद रस्ते, अनीमिया मुक्त गाव उपक्रम, तसेच बचतगटांतून उद्योजकता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न असे अनेक उपक्रम सुरू आहेत.
या सर्व कामांची दखल प्रशासनाने घेतली असून, ग्रामपंचायतीचे सरपंच शंकर गाढवे (बापू), उपसरपंच कृषीकेश गाढवे, सदस्य आनंदा गुरव, रणजित गाढवे, समीर भिंताडे, ज्योती सातपुते, भारती पवार, दिपाली घाटे, सिंधू गाढवे तसेच विशेषतः ग्रामपंचायत अधिकारी शंकर चिकटूळ हे रात्रंदिवस कार्यरत आहेत.
ग्रामपंचायतीत सकाळ–दुपार–संध्याकाळ अशा तीन टप्प्यांत कामांचे नियोजन करून प्रत्येक सदस्याला स्वतंत्र जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.अंगणवाडी सेविका–मदतनीस, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, आशा सेविका, सीआरपी तसेच सर्व ग्रामस्थ यांनी या अभियानात उत्साहाने सहभाग नोंदवत गावाच्या विकासासाठी झोकून देऊन काम सुरू ठेवले आहे.
बोपर्डी गावात अभियानामुळे शिस्तबद्धता, स्वच्छता आणि सर्वांगीण विकासाची चळवळ बळ धरत असून हे गाव आदर्श ग्रामविकासाचा आदर्श ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.





