छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ‘अजिंक्यतारा मराठी भाषा प्रसार युवक मंडळा’ची स्थापना
प्रथमेश बाबर अध्यक्ष, अनिकेत पडघे सचिव
सातारा, दि.११ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या पुढाकाराने संपूर्ण राज्यात मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे मराठी विभागात ‘अजिंक्यतारा मराठी भाषा प्रसार युवक मंडळा’ची स्थापना ११ जुलै २०२५ रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अभ्यास सदन येथे करण्यात आली. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार, बोलीभाषांचे संवर्धन, तसेच विद्यार्थ्यांमध्ये भाषिक स्वाभिमान जागविणे , शासनाने सूचित केलेले मराठी भाषा ,साहित्य ,संस्कृती जतन व संवर्धन या उद्देशाने या मंडळाची रचना करण्यात आली आहे.
या मंडळाच्या अध्यक्षपदी प्रथमेश भगवान बाबर, तर सचिवपदी अनिकेत पडघे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे युवा मंडळ कार्यरत राहणार असून, वर्षभर विविध मराठी भाषिक उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये वाचन व लेखन कार्यशाळा, वक्तृत्व स्पर्धा, भाषासंवाद, बोलीभाषा संवर्धन, ग्रामीण ,परिसरात ,तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळात ,मराठी भाषा प्रचार प्रसार काम केले जाणार आहे. कार्यकारी समिती खेरीज या मंडळात कोणीही महाराष्टातील युवक व अगदी परराज्यातील युवक देखील सहभागी करून घेतले जात आहे. अजिंक्यतारा मराठी भाषा प्रसार मंडळात तनुजा वर्पे, राहुलनाथ योगी, त्रिशाली शिंदे, तनुजा चव्हाण, कोमल वरनारायण, यश दडस, अमर काळे, ऋतुजा सूर्यवंशी आणि प्रथमेश दुर्गावळे यांचा सदस्य म्हणून निवड झालीआहे. या माध्यमातून समाजातील युवकांना जोडून घेत मराठी भाषेविषयी जागरूक करणे, मराठीत ज्ञानसमृद्धी होण्यासाठी जाणीवेने कार्य करणे , शासनाचे मराठी भाषा ,साहित्य ,हा मुख्य हेतू आहे.
अजिंक्यतारा मराठी भाषा प्रसार युवक मंडळ स्थापनेप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी कार्यकारिणीतील विद्यार्थ्यांचे गुलाब फुले देऊन अभिनंदन केले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की मराठी विभाग नेहमीच सजग राहून विविध उपक्रम करून विद्यार्थ्याशी संवादी राहतो,आणि विद्यार्थी हिताचे उपक्रम करून ज्ञान कौशल्य वाढीसाठी प्रयत्न करतो. राज्य शासनाचे कोणतेही मराठी भाषा विषयक कार्यक्रम प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात मराठी विभागाने प्रयत्न केले आहेत. या पुढच्या काळात मराठी भाषेत आधुनिक ज्ञान विज्ञान घेऊन येणे आणि मराठी भाषा ज्ञान समृद्ध करणे ,मराठी भाषेचा विस्तार करणे ,मराठीतून दर्जेदार साहित्य निर्मिती करणे ,या गोष्टी आवर्जून करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक व मराठी भाषा विभाग प्रमुख प्र.डॉ,सुभाष वाघमारे म्हणाले की ‘ आजपर्यंत आपण केवळ भाषा संवर्धन करण्याचे हेतूने विविध उपक्रम केले आहेत..पण आता मराठी भाषेतून आधुनिक रोजगार मिळण्यासाठीच्या क्षमता तयार करणे, तसेच बोलीभाषा जतन संवर्धन करणे ,मराठ्तून लेखन करणाऱ्या साहित्यिकांना विचार व्यक्त करण्याची संधी देणे ,मराठी माणसाची कल्पकता वाढेल असे पर्यावरण उपलब्ध करून देण्यासाठी युवक मंडळातील प्रत्येक सदस्य हा सक्षम असायला हवा . त्या दृष्टीने भाषा कौशल्ये आणि आधुनिक ज्ञान याचा उपयोग करत ,मराठी कशी हिताची आहे,हे प्रयोगाने सिद्ध करण्याची ,प्रचीती येण्याची बाब आहे. मंडळातील सर्व विद्यार्थ्यांच्या मध्ये भाषिक व नैक्तिक शक्ती उभा करण्यास मराठी भाषा विभाग प्रयत्न करील. असेही ते म्हणाले.यावेळी कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख , लेखिका ऐश्वर्या भोसले प्रा.रामचंद्र गाडेकर,प्र.डॉ.आबासाहेब उमाप ,प्र.डॉ. संजयकुमार सरगडे महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक, विद्यार्थी संख्येने उपस्थित होते.
