पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन
मुंबई -चित्रपट महर्षी व्ही. शांताराम यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून संध्या यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. पिंजरा हा त्यांचा गाजलेला चित्रपट होता. तसंच संध्या यांनी झनक झनक पायल बाजे, नवरंग या आणि अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. टपोरे डोळे आणि चेहऱ्यावरचे हावभाव यातून बोलणाऱ्या संध्या यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनात त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. अरे जा हरे नटखट या गाण्यात त्यांनी पुरुष आणि स्त्री अशी वेशभुषा करुन नाच करत सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं होतं. अशा हरहुन्नरी अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली आहे.
ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी त्यांच्या आयुष्यात तीन विवाह केले होते. संध्या या त्यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. दुसरी पत्नी, अभिनेत्री जयश्री यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच शांताराम यांनी संध्या यांच्याशी विवाह केला होता. संध्या यांनी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले असले, तरी त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. अभिनयासोबतच त्या एक कुशल नृत्यांगना म्हणूनही ओळखल्या जात होत्या.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी ट्विट करून ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाची माहिती शेअर केली. त्यांनी लिहिले, भावपूर्ण श्रद्धांजली! प्रसिद्ध पिंजरा चित्रपट अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी खूप दुःखद आहे.
