भाजप ठरला पहिल्या क्रमांकाचा पक्ष
राज्यात भाजपचे १२९ नगराध्यक्ष निवडून आले असून भाजपच्या दृष्टीने २०१७ च्या निवडणूक निकालांच्या तुलनेत दुप्पट यश मिळाले आहे. गेल्यावेळी विविध नगरपालिकांमध्ये भाजपचे १६०१ नगरसेवक होते व आता ही संख्या ३३२५ वर गेली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने चांगले पाय रोवले असून गुहागर, देवरुख या ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. सिंधुदुर्गमध्ये मात्र माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे हे भाजपचे असूनही शिवसेना (एकनाथ शिंदे) आमदार निलेश राणे यांनी मालवणमध्ये चांगली कामगिरी करुन दाखविली आहे. येथे भाजप-शिवसेनेतच लढत होती. विदर्भ हा भाजपचा गड असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे भाजपने नागपूर, गडचिरोली जिल्ह्यात चांगली कामगिरी केली. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसने भाजपला धक्का देत बाजी मारली. ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी चांगली मेहनत घेतली. रायगड जिल्ह्यात शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचे वर्चस्व दिसून आले. मुक्ताईनगरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांना फटका बसला आहे.
राज्यभरात काही ठिकाणी महायुती एकत्र लढली, स्थानिक आघाड्या केल्या तर अनेक ठिकाणी महायुतीतील भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात लढत होती. महायुतीतील तीनही पक्षांनी ७५ टक्के जागा जिंकल्या आहेत. भाजपने पहिला क्रमांक मिळविला असला तरी शिंदे आणि अजित पवार गटाचीही ताकद सत्तेत असताना वाढलेली आहे. भाजप २०२९ मध्ये स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्यावर्षी कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले होते. नगरपालिकांचा निकाल अतिशय मर्यादित स्वरुपाचा आणि स्थानिक राजकारणावर आधारित असला तरी भाजपने पुढील काळात स्वबळाचे राजकारण करण्यापेक्षा महायुतीचीच गरज असल्याचे दाखविणारा असल्याचे मानले जात आहे.
महायुतीतील तीनही पक्षांनी नगरपालिका निवडणुकीत ७५ टक्के जागा पटकावल्याने महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी त्यांचे मनोबल वाढले आहे. पण महापालिका व जिल्हा परिषदांसाठी युती न केल्यास एकमेकांंमध्ये लढून महाविकास आघाडीतील पक्षांचा फायदा अधिक होईल, का असा विचार आता सुरु झाला आहे. नगरपालिका निवडणुकीत पहिल्या तीन क्रमांकांचे पक्ष हे महायुतीतीलच आहेत. त्यामुळे महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या ठिकाणी युती नसेल, तेथे या पक्षांमध्येच प्रामुख्याने लढत होईल. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे व पवार गटाची ताकद वाढल्यास ते भाजपला २०२९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तापदायक ठरणार आहे.



