पाठिंब्यामुळे निवडणूक सुकर; प्रभाग ४ ‘ब’ मध्ये बिरामणे–वाशिवले आघाडी मजबूत
महाबळेश्वर – महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ सध्या सर्वाधिक चर्चेत आला असून, ‘ब’ विभागात घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. बिरामणे–वाशिवले यांची झालेली एकजूट ही या निवडणुकीतील महत्त्वाची घटना ठरत आहे. या प्रभागामध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट झाली आहे. कुमार शिंदे यांच्या कल्पक नेतृत्वामुळे गिरिस्थान नगर विकास आघाडीच्या नियोजित उमेदवारास बळकटी मिळाली आहे.
प्रभाग ‘ब’ मध्ये स्थानिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या विमल पांडुरंग बिरामणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दमदार उमेदवारी दाखल केली आहे. शांत, संयमी स्वभाव आणि वर्षानुवर्षे प्रभागात केलेल्या सामाजिक कार्यामुळे त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
याच विभागातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या शर्मिला हणमंत वाशिवले यांनी अचानक महत्त्वाचा निर्णय घेत विमल बिरामणे यांना जाहीर पाठिंबा दिला. या निर्णयामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली आहेत.
पाठिंब्याची घोषणा करताना शर्मिला वाशिवले म्हणाल्या,
“प्रभागाच्या हिताला प्राधान्य देत विकासाला गती देण्यासाठी सक्षम उमेदवारासोबत उभे राहणे गरजेचे आहे. विमल बिरामणे हे प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी जोडलेले असून त्यांच्याकडे स्वच्छ दृष्टीकोन आणि काम करण्याची प्रबळ इच्छा आहे.”
या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
विमल बिरामणे यांनी या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले,
“शर्मिला ताईंनी दाखवलेला विश्वास आमच्यासाठी मोठी ताकद आहे. ही एकजूट प्रभाग ४ मधील एकात्मतेचे आणि सकारात्मक बदलाचे प्रतीक आहे. लोकांचे प्रश्न सोडवणे आणि विकासकामे प्राधान्याने पूर्ण करणे ही आमची सामूहिक जबाबदारी आहे.”
बिरामणे–वाशिवले यांची ही मजबूत एकजूट प्रभाग ‘ब’ मधील निवडणूक लढतीला नवे वळण देणारी ठरली असून, इतर उमेदवारांसाठी हे मोठे आव्हान मानले जात आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ४ पुन्हा एकदा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे.




