भुईंज पोलिसांनी केले चार जण दोन वर्षांसाठी तडीपार
वाई प्रतिनिधी( शुभम कोदे)वाई तालुक्यातील भुईंज पोलीस ठाण्यात शरिराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना सातारा पोलिसांनी संपूर्ण जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
तडीपार झालेल्यांमध्ये टोळीप्रमुख मयुर शिवाजी भोसले (वय २०, रा. खालचे चाहुर, भुईंज) याच्यासह संदीप सुरेश पवार (वय २४, रा. भुईंज), विशाल सुभाष भोसले (वय २३, रा. विराटनगर, पाचवड) व अमर विलास माने (वय १९, रा. विराटनगर, पाचवड) या चौघांचा समावेश आहे.
या टोळीवर दरोडा टाकणे, खुनाचा प्रयत्न करणे, शिवीगाळ-दमदाटी करून दुखापत करणे, चारचाकी वाहन पेटवून देणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वेळोवेळी अटक व प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांनी गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवल्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते.
भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता. चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी बी. वाय. भालचिम यांनी केली.
पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोषी व हद्दपार प्राधिकरण यांनी सुनावणीनंतर या चारही आरोपींना दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे.सरकार पक्षामार्फत या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व भुईंज पोलिसांनी ठोस पुरावे सादर केले.
सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आगामी काळात सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए यांसारख्या कठोर कारवाया केल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
