भोंडल्याच्या खेळात रंगल्या श्रीपतराव पाटील हायस्कूलच्या नवदुर्गा
सातारा : करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त महा भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विद्यालयातील विद्यार्थिनी, माता पालक, शिक्षिका, संस्थेच्या महिला पदाधिकारी या सर्वांनीच उत्साहाने सहभाग घेतला.
शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा सौ.वत्सला डुबल, चेअर पर्सन सौ प्रतिभा चव्हाण, संचालिका सौ हेमकांची यादव, सौ सुषमा पाटील ज्येष्ठ शिक्षिका सौ सुनीता देशमुख व माता पालक यांच्या हस्ते हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
‘ ऐलमा पैलमा’ ‘एक लिंबू झेलु बाई दोन लिंबू झेलू’ या पारंपारिक गीतांच्या तालावर फेर धरून महाराष्ट्राची संस्कृती जोपासली. व हे पारंपारिक खेळ जोपासण्याची जबाबदारी नवीन पिढीकडे सोपवली. पारंपारिक भोंडल्याचा गाण्याचा व खेळाचा आनंद सर्वांनी मनमुराद लुटला. शेवटी खिरापत वाटून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम नियोजनबद्ध व उत्तमरीत्या पार पाडण्यासाठी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तुषार पाटील, पर्यवेक्षक यशवंत गायकवाड व सहकारी शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





