Home » Uncategorized » औंधचे श्री यमाई देवीचे जागृत देवस्थान

औंधचे श्री यमाई देवीचे जागृत देवस्थान

औंधचे श्री यमाई देवीचे जागृत देवस्थान

माण देशातील यमाई देवीचे जागृत देवस्थान औंधच्या दक्षिणेस असलेल्या डोंगराच्या माथ्यावर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे. श्री यमाई देवीची मंदिरे महाराष्ट्रात अनके ठिकाणी आहेत परंतु औंधमधील हे मंदिर मूळपीठ आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह उत्तरकर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री यमाई देवी मंदिर त्याचबरोबर औंधमध्ये असणाऱ्या चित्रसंग्रहालय व ग्रंथालयामुळे पर्यटकांच्या हे जास्त परिचयाचं झालेलं आहे.नवरात्रोत्सवानिमित मूळपीठ डोंगरावरील श्रीयमाईदेवी, ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवी, राजवाड्यातील कराडदेवी येथे मंत्रपठन, मंत्रपुष्पांजली महाआरती याबरोबरच कीर्तन व अन्य कार्यक्रमांचे आयोजनकरण्यात येते.

श्रीयमाई देवीच्या यात्रेला (पौष कृष्ण प्रतिपदा) नवरात्र उत्सवामध्ये, श्रावणामध्ये मंगळवार व शुक्रवारी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते.औंध येथीलगोरगरिबांचा अनन्वित छळ करून मातलेल्या औंधासुराचा सर्वनाश करण्यासाठी माताजगदंबेने श्री यमाईचे रूप धारण करून आपल्या पराक्रमाचा साक्षात्कारकेल्यावर प्रसिद्धीस पावलेल्या औंध नगरीत श्री यमाईने आपलेकायमचे वास्तव्य ठेवले. औंध गावाच्या नैऋत्येस १५०० फूट उंच टेकडीवर श्री यमाई देवीच्यास्थानअसूनही देवी अतिशय जागृत व स्वयंभू आहे. अतिशय पौराणिक असे हे मंदिर पूर्णपणे कोरीव दगडामध्येआहे. इ.स. १७४५ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर इ.स. १८६९ मध्ये श्रीनिवास परशुराम पंतप्रतिनिधी यांनी मंदिराच्या तटाचाजीर्णोद्धार केल्याचा शिलालेख आहे.

टेकडीवर असणारं देवीचं मूळ मंदिर तटबंदीमध्ये उभारलेलं असून दुरून हे अगदी जेजुरीच्या मंदिराची आठवण करून देतं. या तटबंदीला दहा बुरूज आहेत आणि दक्षिण, उत्तर बाजूला प्रवेशद्वारे आहेत. या तटबंदीच्या पूर्वेकडे व उत्तरेकडच्या बाजूवर देवनागरीमध्ये लिहिलेले व संस्कृत व मराठी भाषेतील एक-एक शिलालेख आहेत. ते पुढीलप्रमाणे

पूर्वेकडील तटाच्या बाजूवरील लेख

 

श्री देवता मूळपीठ।। कसबे आउंद।। स्वस्ति श्री नृपशालिवाहन शके १६६७ क्रोधननाम

संवत्सरे आश्विन वद्य पंचमी भृगुवासरे तदीने परीघ

सिध्यर्थ नामाभिधान लिखीते देवराव मेघ: शाम व

नागोजीराव मेघ:शाम कुलकर्णी ।।

श्री चरणीनीरंतर ।। शुभंभवत्। ॥६॥

उत्तरेकडील तटबंदीवरील लेख श्री मूळपीठ निवासिनी जगदंबा देवीचे पायी श्रीमंत श्रीनिवास परशुराम पंडित प्रतिनिधी यांणी (नी) श्रींचे देवालयाचे शिखराचा जीर्णोद्धार आणि उत्तर व पश्चिम बाजूचा तट अशी दोन कामे नवीन करून श्रीचरणी अर्पण केली आहेत. मिती चैत्र शुद्ध शष्टी (ष्ठी) शके १७९१ शुक्लनाम संवत्सरे

मंदिराच्या आवारामध्ये देवीच्या मंदिराव्यतिरिक्त आणखी एक मंदिर आहे. मुख्य मंदिर एक ते दीड मीटर उंचीच्या जोत्यावर हेमाडपंती पद्धतीत बांधलेले आहे. या शिल्पांमध्ये बऱ्याच देव-देवतांच्या मूर्तीबरोबर विष्णु दशावतारांच्या मूर्तीही आहेत. मंदिरासमोर छोटेखानी नंदीमंडप आहे. याच्या बाजूला तटबंदीमध्ये नऊ ओवऱ्या आहेत. यातील कोनाड्यांमध्ये देवतांच्या संगमरवरी मूर्ती आहे. मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत. देवीच्या मंदिराचे सभामंडप आणि गाभारा असे दोन भाग आहेत. सभामंडपामध्ये छतावर केलेले कोरीव कामही पाहण्यासारखे आहे. 

श्री मातेचे मंदिर औंधच्या दक्षिणेस असलेल्या निसर्गरम्य डोंगरमाथ्यावर वसलेलेआहे. डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी पायऱ्या तसेच रस्ता उपलब्ध आहे. पायरी मार्गाने डोंगर चढताना सुरुवातीस देवीच्या पादुकांचे दर्शन होते.मूळपीठालाजाण्यासाठी खालून वरपर्यंत ४३२ पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस संगमरवरात कोरलेली पुरातन काळातील हत्ती, वाघ, सिंह, घोडे,द्वारपाल यांचे संगमरवरी पुतळे आहेत. 

तसेच मूळपीठडोंगरावर जाण्यासाठी भक्तांना रस्त्याचीही सोय आहे.डोंगरात असलेले गणेश मंदिराचे दर्शन होते.पुढे पायरी मार्गाने मंदिराकडे प्रस्थान करताना पुन्हा दोन्ही बाजूस गरुड व हनुमान यांची संगमरवरातील शिल्पे पुढे नजरेस पडतात. भक्कम तटबंदी असलेल्या या किल्ल्यात श्री यमाई देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात गणपती, दत्त, विष्णू, हनुमान व सरस्वती यांच्या मूर्ती व दत्त मंदिर आहे. यामंदिराशेजारी नगारखाना असून मंदिरासमोर एक महाकाली नंदी आहे.

त्याबरोबरच दोन अतिभव्य अशी प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराजवळ घाटशिळा (देवीच्या आंघोळीचा दगड) आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्रितपणे स्वयंभू लिंगसुध्दा येथे आहे. तटबंदिस पूर्वेस एक खिडकी असून तिच्या दोन्ही बाजूस फिरते दगडी खांब येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेतात. देवीच्या समोर असणारे हेदोनफिरते खांब ही फार दुर्मीळ अशी कलाकृती असून हे खांब लोकांचे खूप आकर्षण ठरतात.

सह्याद्रीच्या पर्वतरांगात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि ऐतिहासिक कलेचा वारसालाभलेल्या सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस असलेल्या औधनगरीचा उल्लेख विविध कलाविष्कारांनी संपन्न नगरी म्हणून केला जातो. खिडकीतून सूर्योदयाची किरणे थेट श्री यमाई देवीच्या मुखावर पडतात. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री यमाई देवीची काळ्या पाषाणात घडविलेली आणिकमळात स्थित असलेली मूर्ती आहे.गाभाऱ्यात चांदीच्या प्रभावळीत असणारी श्री यमाई देवीची मूर्ती ही ६.५ फूट उंचीचीअसून अतिशय मनमोहक व तेजस्वी आहे. वालुकामय मूर्ती असून चतुर्भुज आहे. तिच्या हातामध्ये खडग, डमरू, अमृताची वाटी व त्रिशूळ आहे. या मूर्तीच्या समोरच शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. डोंगरावरील यमाई मंदिर हे अतिप्राचीन भव्य, दगडी कोरीव, कलाकृतीचा उत्तम नमुना आहे. मुक्त झालेल्या औंधासुराने देवीकडे याचना करून तिच्या मंदिरासमोर स्थान प्राप्त केले. म्हणूनच देवीच्या मंदिरासमोर औंधासुराचेही मंदिर आहे.

 मंदिराभोवतील तटबंदीवर जाण्यासाठी दोन्ही प्रवेशद्वारांच्या बाजूने पायऱ्या आहेत. इथून अगदी यवतेश्वर डोंगररांगा, चाळकेवाडी पठारावरील पवनचक्क्या सुद्धा व्यवस्थित दिसतात.

  औंधही नगरी श्री यमाईदेवीच्या पदस्पर्शाने पावन झालेली कलानगरीआहे. औंध ही नगरी इ. स. १३०० वर्षांपूर्वी चालुक्य घराण्यातील एका राजानेवसवली आहे. महालक्ष्मी करवीरवासिनी हिच्या प्रचंड तपश्चर्येने ती दुष्टांचानिःपात करते व जोतिर्लिंगे स्थापन करते. दुसऱ्या बाजूला जोतिबा औंधासुर नावाच्या अतिपराक्रमी व कपटी राक्षसाला जिंकायला औंधला आले. त्यावेळी त्यादोघांमध्ये महाभयंकर युद्ध होते पण औंधासुर महापराक्रमी असल्यामुळे तो काहीकेल्या पराभूत होत नाही हे पाहून विघ्नहर्ता जगदंबा देवीने श्री यमाईदेवीचे रूप धारण करते व औंधासुरचा सर्वनाश करते आणि सर्व जनतेस भयमुक्तकरते आणि म्हणूनच या नगरीस औंध हे नाव पडले, त्यानंतर श्री यमाईने येथे वास्तव्य केले अशी आख्यायिका आहे.

तो दिवस हा पौष पौर्णिमेचा दिवस भक्तगणांनी आनंद उत्सव म्हणून साजरा करण्यास सुरवात केली, आजही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पौष महिन्यात पौर्णिमेस देवीची यात्रा भरते. यात्रेस महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरून देखील भक्त येतात. या ठिकाणी औंध गावामध्ये आणि गावाजवळच्या टेकडीवर अशी यमाई देवीची दोन मंदिरं आहेत. त्यांपैकी पर्यटकांनाफक्त टेकडीवरील मंदिरच माहिती आहेपण औंध गावामध्ये असलेले मंदिरही आवर्जून पाहण्यासारखं आहे.

 येथेमिळालेल्या माहितीनुसार श्री यमाई देवीच्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम हेवेळोवेळी करण्यात येते. इ. स. १८८० मध्ये मंदिरासमोरील नंदी मंदिर वप्रदक्षिणा दत्त मंदिराच्या जीणोंद्धाराचे काम झाले. त्यानंतर के. श्रीमंत श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते जुलै १९९४ मध्ये मंदिराच्या शिखराचे जीर्णोद्धाराने काम सुरू झाले व त्याची पूर्तता नोव्हेंबर १९९७ मध्ये झाली.श्रीमंत रावसाहेबांच्या निधनानंतर कै.श्रीमंत भगवंतराव पंतप्रतिनिधी यांनी हे काम केले व मूळपीठ डोंगरावरील शिखरावर कळस बसवण्यास सुरुवात केली. परंतु बाळराजांच्या आकस्मिक निधनानंतर गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी २० ऑक्टोबर २००० रोजी श्री मूळपीठ देवीमंदिरावर सोन्याचा मुलामा दिलेला कलशारोहण केला.

 त्यानंतर यमाई देवीचे माहात्म्य वाढावे, भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठीवाढीव रस्ता, पायऱ्यांची दुरुस्ती, संरक्षण भिंत बांधकाम, श्री यमाई मंदिरातील प्रभावळ, स्वयंभू बैठकीवर चांदी चढवण्यात आली. मंदिराच्यारंगरंगोटी काम केले. प्रतिवर्षी पौष महिन्यात नियमितग्रामनिवासिनी व मूळपिठ निवासिनी श्री यमाईदेवीस अभिषेक घालण्यात येतो. त्यास भोगी म्हणतात. यावेळी मंत्रपुष्प, दही, दूध आदी पूजा साहित्यासहदेवीची पोडषोपचारे महापूजा केली जाते. पौष शाकंभरी पौर्णिमेला श्रीयमाईदेवी पालखीतून मिरवणूक काढली जाते त्यास छबिना म्हणतात. त्यामध्ये गोंधळ, डवरी, जागर सादर करतात. “आई उदे ग अंबे उदे या जयघोषात परिसरदुमदुमून जातो. राज्यातील सर्वात उंच दिपमाळ प्रज्वलित केली जाते.

 यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी श्री यमाईदेवीची षोडशोपचार पारंपरिक पद्धतीने पूजाकरून देवीची मूर्ती रथात ठेवतात. यानंतर रथ ग्रामप्रदक्षिणेसाठी निघतो.यावेळी भाविक नोटांच्या व नारळाच्या माळा रथावर अर्पण करतात. दोरखंडाच्या साहाय्याने रथ ओढला जातो. रथाची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर सायंकाळी रथगावातील श्री यमाई मंदिराच्या महाद्वारासमोर आल्यानंतर देवीची पालखीतून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रतिष्ठापना करून पूजा, आरती पारंपरिक पद्धतीने करतात. त्यानंतर श्री यमाई देवी रथोत्सवाची सांगता होते. अशी येथीलरथोत्सवाची परंपरा आहे. देवीच्या रथोत्सवानिमित्त यात्रा भरवली जाते.यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा उत्सव श्री यमाईदेवी देवस्थान कमिटीच्या वतीने यशस्वीपणे पार पडतो.

टेकडीवरील यमाई देवी मंदिरापासून जवळचऔंधगाव वसलेलं आहे. औंध गावात देखील श्री यमाई देवीचे भव्य मंदिर आहे. गावामध्ये असणारे यमाई देवीचे मंदिर बाळासो प्रतिनिधींच्या वाड्याशेजारी तटबंदीमध्ये आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून त्यासमोरच औंधेश्वराची मूर्ती आहे.या मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. प्रवेशद्वाराव्यतिरिक्त, मंदिराच्या बाजूला आणखी एक नगारखाना आहे. मंदिराच्या प्रांगणामध्ये चार दीपमाळा आहेत. 

 

मंदिर हेमाडपंती पद्धतीचे असून त्याचा सभामंडप लाकडी; पण दोनमजली आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीच्या प्रभावळीत देवीची पाषाणाची आणि पंचधातूची उत्सवमूर्ती आहे. सभामंडपामध्ये श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी आपल्या कुंचल्यातून चितारलेलीपुरानातील घडामोडींची तैलचित्रे तसेचशिवचरित्रातील दृश्यं, सप्तमातृका, कृष्णचरित्र यांची चित्रे लावलेली आहेत.या मंदिराच्या शेजारीच राजवाडा असून यातही त्यांच्या कलाकृती आहेत.मंदिराच्या समोरअसलेली दीपमाळ ही राज्यातील सर्वात उंच दीपमाळ असल्याचेअसे बोलले जाते. औंधमध्ये येणाऱ्या पर्यटकांनी आवर्जून पाहण्यासारखं हे मंदिर आहे.

मंदिराजवळ पोहोचण्याआधी पठारावर उजव्या बाजूस सुप्रसिद्ध भवानी संग्रहालय लागते. हे संग्रहालय श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी तयार केले असून यामध्ये अनेक चित्रकृती, शिल्पे आणिपुरातन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या संग्रहालयाची स्थापना सन १९३८ मध्ये भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंडित प्रतिनिधी यांनी केली. त्यांनी जमविलेल्या बऱ्याच दुर्मीळ गोष्टी इथे प्रदर्शनी ठेवलेल्या आहेत. बाळासो पंडित प्रतिनिधी हे स्वत: रसिक चित्रकार असल्याने त्यांनी काढलेली, शिवाय राजा रविवर्मा, पंडित सातोळेकर, बाबूराव पेंटर यांच्याबरोबर फ्रान्सिस्को, एल. गोया, जी. बॉल्टर, एस. कॉर्निया पाश्चात्य कलाकारांनी काढलेल्या चित्रांचाही इथे सुंदर संग्रह प्रदर्शनी ठेवलेला आहे. 

 

यांबरोबरच काही प्रसिद्ध चित्रांची प्रतिकृतीही इथे पाहायला मिळते. शिल्पकला दालनामध्ये संगमरवर, ब्राँझ, चंदन आणि हस्तिदंत यांच्या शिल्पाकृती आहेत. यांतील हस्तिदंत आणि चंदनावरील केलेले कोरीव काम अप्रतिम आहे. प्रसिद्ध शिल्पकार रामचंद्र गुडीयार यांनी चंदनावर कोरलेले शिवचरित्र, रामायण हे लक्ष वेधून घेणारं आहे. तसेचऔंधमधील स्थानिक कलाकारांनी केलेल्या शिल्पाकृतीही खूप सुंदर आहेत. आता हे संग्रहालय महाराष्ट्राच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाच्या ताब्यात आहे.श्री भवानी संग्रहालयाची वेळ सकाळी १० ते ५.३० पर्यंत असते. 

सातारा-औध अंतर (रहिमतपूरमार्गे) ४६ कि.मी. आहे. या ठिकाणी मुक्कामाची सोय नाही. औंध गावापासून नऊ-दहा कि.मी. वर सिद्धेश्वर कुरोली गावामधील सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिरही पाहण्यासारखे आहे. मंदिराच्या प्रशस्त आवारामध्ये लक्ष्मी-नारायण, ज्योतिबा, महादेव, गणेश, दत्त, खंडोबा यांची छोटेखानी मंदिरे आहेत शिवाय एक मोठी विहीर आहे. सिद्धेश्वराच्या मंदिरासमोर नंदीमंडप आणि दीपमाळ आहे. मंदिराला सभामंडप आणि गाभारा असे दोन भाग आहेत. गाभाऱ्यामध्ये मोठं शिवलिंग असून त्यावर शाळुंका आहे. या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे शाळुंकेवर पाण्याची संततधार धरल्यास शिट्टीसारखा आवाज येतो. याला सिंहनाद म्हणतात. शिवाय गोंदवलेकर महाराजांच्या प्रेरणेने गावामध्ये १९११ साली बांधलेले राममंदिरही पाहण्यासारखे आहे. औंध सहलीत तुम्ही हे पण करू शकता.

सहा.प्रा. सूर्यकांत शामराव अदाटे

(लेखक दुर्ग व किल्ले तसेच मंदीर अभ्यासक आहेत)

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

Post Views: 37 शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात सातारा: करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील

Live Cricket