देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या भाजपा कार्यालयात हा सोहळा पार पडला. यानंतर अशोक चव्हाण यांनी आपण आता भाजपासाठी संपूर्ण निष्ठेने काम करणार आहोत असं म्हटलं आहे. तसंच भाजपात मी कुठल्याही पदासाठी आलो नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा देईल ती जबाबदारी स्वीकारुन पूर्णपणे विकासासाठी काम करणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले “आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातलं एक ज्येष्ठ नेतृत्व आमच्याकडे आलं आहे. देशाची लोकसभा आणि विधानसभा गेली अनेक वर्षे ज्यांनी गाजवली. विविध मंत्रिपदं ज्यांनी भुषवली आणि दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली असे अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करत आहेत. मी सर्वात आधी भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती यांना अशोक चव्हाण यांचा प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म आहे त्यावर सही करुन त्यांना भाजपात प्रवेश द्यावा.” देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगिल्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना अर्ज दिला. जो भरुन त्यांना प्रवेश देण्यात आला.