अमित शहांचा पेनड्राइव्ह माझ्याकडे : ममता बॅनर्जी
कोलकता :’केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संबंधित एक पेन ड्राइव्ह माझ्याकडे आहे. राज्यातील कोळसा गैरव्यवहारातील पैसे हे केंद्रातील भाजपच्या नेत्यांपर्यंत पोचत होते. माझ्याकडे याचे पुरावेदेखील आहेत. गरज भासल्यास आम्ही ते जनतेसमोर सादर करू,’ असा इशारा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज येथील निषेध सभेमध्ये बोलताना दिला.
पक्षाच्या ‘आयटी सेल’वर ‘ईडी’कडून घालण्यात आलेल्या छाप्यांच्या पार्श्वभूमीवर कोलकत्यामध्ये आज ममतांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये ममतांसह पक्षातील अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले होते.
ममता म्हणाल्या की, ‘कोळसा गैरव्यवहारातून आलेले पैसे सुवेंदू अधिकारी यांनी वापरले त्यानंतर ते शहा यांच्याकडे पाठविण्यात आले. सर्वसाधारणपणे मी कधीच प्रतिक्रिया देत नाही पण कोणी मला डिवचलेच तर मी सोडणार नाही.आता जी मंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये बसली आहेत ती कधी काळी अमित शहा यांच्या कार्यालयामध्ये कार्यरत होती. माझा त्याला आक्षेप नाही. ज्या पद्धतीने हरियाना आणि बिहारमध्ये भाजपने सत्ता काबीज केली त्याच तंत्राचा आता पश्चिम बंगालमध्ये वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मतदारयाद्यांच्या फेरपडताळणीच्या नावाखाली स्थानिक लोकांना त्रास दिला जात आहे. ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना छळले जात आहे. विविध ठिकाणांवर छापे घालून ‘ईडी’ डेटा आणि आमची रणनीती यांची चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. तपास संस्थेचे अधिकारी हे शुक्रवारी कारवाई करत असताना मी त्या ठिकाणी गेले होते. मी गैरकृत्य केलेले नाही.’




