जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी गौरीशंकर लिंब फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे नवसंशोधनात उत्तुंग कामगिरी डोळ्यातील होणाऱ्या काचबिंदू आजारावर प्रभावी औषध निर्मिती  मोठी बातमी! सुनेत्रा पवार घेणार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर आता मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला  अजितदादा : राजकारण, समाज आणि शिक्षण यांना जोडणारे निर्णायक नेतृत्व – प्रा.दशरथ सगरे कोलंबियामध्ये सतेना एअरलाइनचं एक छोटं विमान कोसळलं
Home » राज्य » शिक्षण » अजितदादा : राजकारण, समाज आणि शिक्षण यांना जोडणारे निर्णायक नेतृत्व – प्रा.दशरथ सगरे

अजितदादा : राजकारण, समाज आणि शिक्षण यांना जोडणारे निर्णायक नेतृत्व – प्रा.दशरथ सगरे

अजितदादा : राजकारण, समाज आणि शिक्षण यांना जोडणारे निर्णायक नेतृत्व – प्रा. दशरथ सगरे

आज सोशल मीडियावर नजर टाकली तर एकच वास्तव समोर येते—फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सर्वत्र एका नावाचीच चर्चा आहे. कुणाच्या स्टेटसवर, कुणाच्या स्टोरीत, तर कुणाच्या शब्दांत दादा दिसत आहेत. आयुष्यभर लोकांच्या मनात स्थान निर्माण करणे हे सोपे नसते, पण आज त्या असंख्य पोस्ट्समधून एक गोष्ट स्पष्ट होते—दादांनी ते स्थान कमावले होते. म्हणूनच त्यांच्या अचानक जाण्याची बातमी स्वीकारणे मनाला कठीण जाते.

तुमचं नियोजन नेहमी अचूक असायचं. म्हणूनच हा अपघात अधिक अस्वस्थ करतो. इतक्या घाईत का निघालात, हा प्रश्न मनाला छळत राहतो. एखाद्या सभेत काही चूक झाली असती, तर तुम्ही थेट खाली उतरून जबाबदार व्यक्तीला जाब विचारला असता. तुमच्या त्या खास शैलीत एखादं वाक्य फेकलं असतं आणि हजारो लोकांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला असता. आजही त्या बातम्या पाहायला मिळाल्या असत्या, तर चाललं असतं. पण आज दिसतंय ते दृश्य स्वीकारणं फार कठीण आहे.

तुमचं एक जुने वक्तव्य आठवतं. तुमच्यापेक्षा ज्युनियर असलेले काही नेते पुढे गेले, याची खंत तुम्ही प्रांजळपणे बोलून दाखवली होती. पण लगेचच तुम्ही तेही म्हणालात की प्रत्येक जण आपापल्या वाटेने आपली जागा मिळवत असतो; राजकारण आणि आयुष्य असंच चालतं. ही खिलाडू वृत्ती, ही प्रामाणिक कबुली, हीच तुमची वेगळी ओळख होती.

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात काही व्यक्तिमत्त्वे केवळ सत्तेच्या पदांपुरती मर्यादित राहत नाहीत, तर त्यांच्या कार्यशैलीमुळे, निर्णयक्षमतेमुळे आणि समाजाशी असलेल्या नात्यामुळे काळाच्या ओघात प्रभावी ठरतात. अजितदादा पवार हे असेच एक नेतृत्व होते. राजकीय क्षेत्रात ठाम भूमिका, सामाजिक प्रश्नांवरील स्पष्ट दृष्टिकोन आणि शिक्षणाकडे विकासाचे साधन म्हणून पाहण्याची दृष्टी यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी स्वरूपाचे असे होते.

अजितदादा पवार यांच्या राजकीय वाटचालीकडे पाहिले असता, त्यांनी नेहमीच निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. राजकारणातील त्यांच्या भूमिकांमध्ये स्पष्टता दिसून यायची. सत्तेत असताना प्रशासन गतिमान ठेवण्यावर त्यांचा भर राहिला, तर विरोधात असताना त्यांनी तितक्याच ठामपणे प्रश्न उपस्थित केले. निर्णय टाळण्याऐवजी जबाबदारी स्वीकारण्याची वृत्ती ही त्यांची राजकीय ओळख होती. राजकीय नेतृत्व म्हणजे केवळ लोकप्रियता नव्हे, तर कठीण प्रसंगी घेतलेले निर्णयही असतात, हे अजितदादांच्या कारकीर्दीतून अधोरेखित होते. 

सामाजिक दृष्टिकोन : ग्रामीण प्रश्नांची जाण

अजितदादा पवार यांचे सामाजिक भान प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्राशी जोडलेले होते. शेती, पाणी, सिंचन, सहकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था हे विषय त्यांच्या विचारविश्वाच्या केंद्रस्थानी राहायचे. पाणीप्रश्नासारख्या संवेदनशील विषयावर त्यांनी घेतलेल्या भूमिका अनेकदा चर्चेचा विषय ठरल्या, मात्र त्यामागील दीर्घकालीन विचार आणि व्यावहारिक दृष्टिकोन कालांतराने स्पष्ट होत गेला.

ग्रामीण समाजातील युवकांना संधी मिळाव्यात, शेती टिकाऊ व्हावी आणि गावकेंद्रित विकास घडावा, हा विचार त्यांच्या सामाजिक भूमिकेत सातत्याने दिसून आला. समाजातील दुर्बल घटकांबाबत त्यांनी वेळोवेळी भूमिका घेतली, विकास हा केवळ शहरी भागापुरता मर्यादित नसावा, ही भूमिका त्यांनी कायम ठेवली. 

शिक्षणाविषयी दृष्टी : विकासाचा पाया

अजितदादा पवार शिक्षणाकडे केवळ पदवी मिळवण्याचे साधन म्हणून पाहत नव्हते, तर समाजबदलाचे प्रभावी माध्यम म्हणून पहायचे. ग्रामीण व अर्धशहरी भागात शिक्षणसंस्था सक्षम झाल्या तर स्थानिक विकासाला गती मिळते, ही भूमिका त्यांच्या विचारांत ठळकपणे दिसून आले

तांत्रिक, व्यावसायिक आणि उच्च शिक्षणाच्या माध्यमातून तरुण पिढी सक्षम व्हावी, रोजगारक्षम व्हावी आणि स्वावलंबी व्हावी, यासाठी त्यांनी शिक्षणविषयक धोरणांना पाठबळ दिले. शिक्षणाचा दर्जा, कौशल्यविकास आणि उद्योगाशी जोडलेले शिक्षण हे विषय आजच्या काळात महत्त्वाचे असून, त्या दिशेने विचार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केलेली आपल्याला पाहायला मिळते.

तरुण पिढी व नेतृत्व

आजच्या तरुण पिढीसमोर रोजगार, स्पर्धा आणि बदलते तंत्रज्ञान ही मोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत राजकीय नेतृत्वाकडून केवळ आश्वासने नव्हे, तर दिशा अपेक्षित असते. अजितदादा पवार यांनी तरुणांसाठी कार्यक्षमता, शिस्त आणि कामावर विश्वास ठेवण्याचा संदेश सातत्याने दिला आहे. 

“राजकारण हे भाषणांपेक्षा कामातून दिसते” हा विचार त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होत होता. त्यामुळेच काही वेळा ते कठोर वाटायचे मात्र त्या कठोरतेमागे परिणाम साध्य करण्याचा आग्रह असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

दीर्घ राजकीय कारकीर्द असलेल्या नेत्याच्या वाट्याला टीका व वाद येणे अपरिहार्य असते. अजितदादा पवार यांच्याबाबतही हेच वास्तव राहिले आहेत. मात्र टीकेला घाबरून भूमिका बदलण्याऐवजी, त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली होती. राजकारणातील टिकाव हा केवळ परिस्थितीवर नव्हे, तर जनतेशी असलेल्या थेट संवादावर अवलंबून असतो, हे त्यांच्या प्रवासातून स्पष्ट होते.

अजितदादा पवार हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक प्रभावी घटक होतेराजकारण, समाज आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रांना जोडणारी त्यांची भूमिका त्यांना वेगळे स्थान देऊन गेली. त्यांचे नेतृत्व कुणाला मान्य असो वा नसो, परंतु दुर्लक्षित करता येईल असे नक्कीच नव्हते. बदलत्या काळात निर्णयक्षम, स्पष्ट आणि परिणामाभिमुख नेतृत्वाची गरज असताना अजितदादा पवार हे त्या प्रवाहातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणून उभे राहिले असते, पण त्यांचे असे अकाली निघून जाणे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला सीमित करण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. 

 यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या इमारतीच्या उद्घाटनाचा प्रसंग अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे. उद्घाटनाच्या औपचारिक कार्यक्रमानंतर दादांनी संपूर्ण इमारतीची पाहणी केली. ही केवळ औपचारिक फेरफटका नव्हता, तर बारकाईने निरीक्षण करणाऱ्या नेतृत्वाची झलक होती. जिन्यांवरून वर जात असताना त्यांनी क्षणभर थांबून जिन्यांच्या पायऱ्यांकडे लक्ष दिले आणि लगेचच पायरीच्या उंचीतील सूक्ष्म फरक त्यांच्या नजरेस पडला. “या जिन्यांची उंची एकसारखी नाही,” असे त्यांनी सहजपणे नमूद केले. उपस्थित आर्किटेक्ट्स, अभियंते आणि संस्थेचे प्रतिनिधी क्षणभर आश्चर्यचकित झाले. इतक्या गडबडीत, इतक्या कार्यक्रमांच्या व्यापातही अशी तांत्रिक बाब त्यांच्या नजरेत येणे, हे त्यांच्या निरीक्षणशक्तीचे आणि गुणवत्तेवरील आग्रहाचे द्योतक होते. त्यांच्यामध्ये असणारे पराकोटीचा बारकावा विलोभनीय असा वाटायचा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी सातारा दि. 30 : सातारा जिल्हा परिषद

Live Cricket