अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन
मुंबई -शोलेतल्या ‘विरु’सह अनेक सशक्त भूमिका साकारणारे दिग्गज बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ८९ वर्षांचे होते. मागील १२ दिवसांपासून ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याची माहिती समोर आल्यावर अनेक बॉलीवूड स्टार त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते. आता त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे.
धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती हेमा मालिनी यांनी दिली होती. पण सोमवारी, १० नोव्हेंबरला त्यांची प्रकृती खालावली आहे आणि ते व्हेंटिलेटर आहेत, अशी माहिती समोर आली. त्यानंतर सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, अमीषा पटेल तसेच संपूर्ण देओल कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले होते. पण उपचारादरम्यान आज ११ नोव्हेंबरला धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला.
८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या धर्मेंद्र यांचे पूर्ण नाव धरम सिंह देओल होते. त्यांचे वडील शाळेत मुख्याध्यापक होते. धर्मेंद्र यांनी एकदा सुरैयाचा ‘दिल्लगी’ हा चित्रपट एका चित्रपटगृहात पाहिला. त्यानंतर त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यांनी सलग ४० दिवस हा चित्रपट पाहिला होता. एकदा धर्मेंद्र यांना समजलं की फिल्मफेअर नव्या कलाकारांच्या शोधात आहे. त्यांनी अर्ज भरला आणि टॅलेंट हंटमध्ये निवड झाल्यावर ते मुंबईत आले.
धर्मेंद्र यांनी १९६० च्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. धर्मेंद्र यांनी ॲक्शन, कॉमेडी, लव्ह स्टोरी अशा प्रत्येक शैलीतील सिनेमे केले आणि प्रेक्षकांची मने जिंकली. १९७० च्या दशकात धर्मेंद्र ‘अॅक्शन हिरो’ म्हणून इतके लोकप्रिय झाले की लोक त्यांना ‘ही मॅन’ म्हणू लागले. १९७५ मध्ये आलेला ‘शोले’ हा चित्रपट धर्मेंद्र यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. या चित्रपटाने त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली, त्याचबरोबर सिनेमातील ‘बसंती’ म्हणजेच हेमा मालिनी यांची त्यांच्या खऱ्या आयुष्यात एंट्री झाली.




