अभिषेक शर्माने वादळी अर्धशतकासह मोडला वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज!
भारताचा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्माने वादळी फटकेबाजी करत नव्या वर्षाची सुरूवात केली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माने धमाकेदार खेळी केली. नागपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात अभिषेक शर्माने ८३ धावांची खेळी करत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या खेळीसह त्याने वर्ल्ड रेकॉर्ड तोडला आहे.
अभिषेक शर्माने पहिल्या टी-२० सामन्यात अवघ्या २२ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेकने ४ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने त्याने हे अर्धशतक पूर्ण केलं. या वादळी खेळीदरम्यान अभिषेकने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. टी-२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारतासाठी चेंडूंच्या बाबतीत हा सर्वात जलद अर्धशतक होतं. यापूर्वी, हा विक्रम केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्या नावे होता, ज्यांनी २३ चेंडूंमध्ये हा पराक्रम केला होता.
अभिषेक शर्माचं अवघ्या काही धावांसाठी शतक हुकलं. अभिषेक बाद होण्यापूर्वी ३५ चेंडूत ५ चौकार व ८ षटकारांसह ८४ धावा केल्या. या धमाकेदार खेळीसह, अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्ध भारतीय फलंदाजाकडून सर्वात जलद टी-२० अर्धशतक करण्याचा विक्रम केला. त्याने गुरू युवराज सिंगला मागे टाकत टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला. युवराज सिंगने त्याच्या संपूर्ण टी-२० कारकिर्दीत ७३ षटकार मारले होते, परंतु अभिषेकने या सामन्यात दोन षटकार मारून हा विक्रम ओलांडला.
अभिषेक शर्माने त्याच्या टी-२० कारकिर्दीत आठव्यांदा २५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत एक नवा विश्वविक्रम आपल्या नावे केला. त्याने या यादीत स्टार फलंदाज फिल सॉल्ट, सूर्यकुमार यादव आणि एविन लुईस यांना मागे टाकलं. या खेळाडूंनी प्रत्येकी २५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत सात वेळा टी-२० मध्ये अर्धशतकं झळकावली आहेत. पण आता अभिषेक शर्माने फक्त ३४ सामन्यांमध्ये आठ अर्धशतकं करत विक्रम ओलांडला आहे.




