शत्रूच्याही स्त्रियांचा सन्मान करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय – शिवव्याख्याते प्रा.विक्रम कदम
तांबवे :- महाराजांनी स्वराज्यातील स्त्रियांसोबत शत्रूच्या स्त्रियांचासुद्धा सन्मान केला.समाजाने छत्रपती शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन आत्मसात केल्याशिवाय समाजात महिला व मुली सुरक्षित राहणार नाहीत.प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी,संकटं व नैराश्यावर मात करून त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला शिवचरित्र प्रेरणादायी ठरते”असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते व इतिहास अभ्यासक शिवचरित्रकार प्रा विक्रम कदम यांनी केले.
कराड प्रोजेक्ट अँड मोटर्स लिमिटेड कंपनी, एमआयडीसी तासवडे आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात ते इतिहासातील कर्तृत्ववान महामानव आणि आजची स्त्री’या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.यावेळी कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर महेश पाटील एच आर मॅनेजर सचिन रणवरे,एच आर ऑफिसर मोनाली देसाई तसेच कंपनीतील महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा विक्रम कदम म्हणाले
“छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक परकीय सत्तासोबत संघर्ष करून रयतेचे स्वराज्य स्थापन केले.या स्वराज्यकार्यात महाराजांना अठरापगड जाती व बारा बलुतेदार कुटुंबातील मावळ्यांनी संघटित केलं.जिथं शिवरायांनी घाम गाळला तिथं मावळ्यांनी रक्त सांडले.महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही.त्यांनी स्वराज्यातील स्त्रियांसोबत शत्रूच्या स्त्रियांचासुद्धा सन्मान केला.छत्रपती शिवाजी महाराज श्रद्धाळू होते पण कर्मकांड व अंधश्रद्धा यावर महाराजांनी कधीही विश्वास ठेवला नाही.लोकशाहीमध्ये जगताना आज कृषिप्रधान भारत देशात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत.शिवकाळात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद नाही.स्वराज्यात सगळ्या जाती-धर्माची रयत सुखी होती.छत्रपती शिवाजी महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन,सकारात्मक दृष्टिकोन,स्त्रीदाक्षिण्य,निर्व्यसनीपणा,प्रयत्नवाद हे सगळे गुण आज आपण अंगिकारले पाहिजेत.
