स्वातंत्र्यदिनी कुंभरोशी येथे भर पावसात झेंडावंदन; विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा
प्रतापगड वार्ताहर: स्वातंत्र्यदिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त कुंभरोशी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, छत्रपती शिवाजी विद्यालय, ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे संयुक्तपणे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी झालेल्या मुसळधार पावसातही विद्यार्थ्यांचा आणि ग्रामस्थांचा उत्साह जराही कमी झाला नाही.
सकाळी ठीक 7.30 वाजता सरपंच कांचन सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच सखाराम ढेबे, बाजार समिती सदस्य पांडुरंग कारंडे, अजय चौरसिया ग्रामपंचायतीचे सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
मुसळधार पाऊस सुरू असतानाही, विद्यार्थी आणि ग्रामस्थ छत्री व रेनकोट घालून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जन गण मन” हे राष्ट्रगीत गाताना पावसात भिजूनही त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि देशाभिमानाची भावना स्पष्टपणे दिसत होती.
संजय सोंडकर यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांच्या योगदानाला आदराने अभिवादन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगून चांगला नागरिक बनण्याचे आवाहन केले. माजी सरपंच सखाराम ढेबे आणि बाजार समिती सदस्य पांडुरंग कारंडे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
पावसाची पर्वा न करता, एकत्र येऊन साजरा केलेला हा स्वातंत्र्यदिन कुंभरोशी गावातील एकजुटीचे आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि भाषणे सादर केली. या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने झाली.





