पेन्स फाउंडेशनचा दुर्गम कोयना खोऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात; शालेय साहित्य वाटप
महाबळेश्वर, महाराष्ट्र: महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम कोयना खोऱ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधनांची कमतरता भासू नये, या उदात्त हेतूने पालघर येथील पेन्स फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. या सामाजिक उपक्रमांतर्गत गरजू शाळांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुकर होणार आहे.

हस्तकला केंद्राचे संचालक मुन्नाशेठ उतेकर यांच्या विशेष सहकार्यामुळे हे मदतकार्य वेळेत गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. या उपक्रमांतर्गत, कासरूड शाळेला प्रिंटर देण्यात आला. बिरमणी, घोगलवाडी आणि कुमठे येथील शाळांना वाचनालयासाठी कपाटे, विद्यार्थ्यांसाठी दप्तरे आणि शालेय साहित्य पुरवण्यात आले. तसेच, कुंभरोशी शाळेतील विद्यार्थ्यांना बस्करपट्टी आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या मदतकार्यात जि.प. शाळा कुंभरोशी व पारसोंडचे शिक्षक श्री. शांताराम मोरे आणि संजय सोंडकर यांनी महत्त्वाची समन्वयकाची भूमिका बजावली. त्यांनी शाळांची नेमकी गरज पेन्स फाउंडेशनपर्यंत पोहोचवून हा उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला.
पेन्स फाउंडेशनच्या या योगदानामुळे दुर्गम आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळाल्या आहेत, ज्यामुळे त्यांचा अभ्यास अधिक प्रभावी होईल. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी पेन्स फाउंडेशनचे आभार मानले आहेत.
स्थानिक रहिवाशांनी अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण आणि आदिवासी भागातील शिक्षणाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. इतर सामाजिक संस्थांनीही अशाच प्रकारे पुढे येऊन समाजातील वंचित घटकांना मदत करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.




