नामदार नितीन गडकरी यांना ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार २०२५’ जाहीर सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल -प्रमोद शिंदे
वाई- किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार २०२५’ या वर्षी भारताचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतृक व नववहन मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराची घोषणा कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी केली आहे.
गडकरी यांनी देशातील रस्ते, महामार्ग, बंदरे आणि जलमार्ग विकासाच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्यामुळे संपूर्ण भारतात भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणले आहे. त्यांचे धोरणात्मक निर्णय, कार्यक्षम प्रशासन आणि दीर्घदृष्टी यामुळे भारतात ‘इन्फ्रास्ट्रक्चर रेव्होल्युशन’ घडून आली आहे. नितीन गडकरी यांचा कार्यकाळ हा सतत नवकल्पना, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि दीर्घकालीन विकासदृष्टी यांचा संगम मानला जातो. त्यांनी देशभरात भारत माला प्रकल्प, सागरमाला योजना, जलमार्ग विकास, इलेक्ट्रिक वाहने प्रोत्साहन आणि हायब्रिड अन्युईटी मॉडेलसारखे महत्त्वाचे प्रकल्प राबवले. यामुळे लाखो युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून ग्रामीण व शहरी भागाचा एकसंध विकास साधता आला. किसन वीर परिवाराच्यावतीने देण्यात येणारा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार – २०२५” हा सामाजिक, आर्थिक, ग्रामीण व राष्ट्रीय विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. राजकीय सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील योगदान पाहता यावर्षीच्या ‘आबासाहेब वीर सामाजिक परस्कारा’साठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील यांचे नेतृत्वाखालील संचालक मंडळाकडून एकमुखी नामदार नितीनजी गडकरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानूसार कारखान्याचे मार्गदर्शक संचालक खासदार नितीनकाका पाटील यांनी नामदार गडकरीसाहेबांना दिल्ली येथे समक्ष भेटून पुरस्काराबाबत माहिती दिली. नामदार नितीनजी गडकरी साहेबांनी देखील हा पुरस्कार स्विकृतीबाबत संमती दर्शवली. नामदार गडकरी यांची या पुरस्कारासाठी निवड ही त्यांच्याद्वारे करण्यात आलेल्या जनकल्याणकारी कार्याची पोहोचपावती आहे, असे प्रमोद शिंदे यांनी सांगितले. हा पुरस्कार प्रदान समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार असून रुपये एक लाख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, त्याबाबतचा अधिकृत कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.
