महाबळेश्वरमधील नालेसफाई अभावी रस्त्यांची दुरवस्था; मानवाधिकार संघटना आक्रमक.
महाबळेश्वर, १ ऑगस्ट २०२५: मान्सूनपूर्व नालेसफाई न झाल्याने महाबळेश्वर शहरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून, याबाबत ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने आज महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा. योगेशजी पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले. नालेसफाईसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात, असे असतानाही यंदा पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे नंदनवन आणि महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. चेरापुंजीनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरमध्ये पडतो. ब्रिटिश काळापासून येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांचा वापर केला जातो. मात्र, यंदा ही नालेसफाई झाली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शहरातील मरी पेठ येथील काही ठिकाणी तर नाले “गायब” झाले असून, काही नाल्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाहीये. परिणामी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. मरी पेठेतील रस्त्यांवर तर वर्षभर खड्डे दिसून येतात, ज्यामुळे ज्येष्ठ व वयस्कर नागरिकांना चालताना मोठा त्रास सहन करावा लागतो. याकडे प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
याचबरोबर, ‘युनियन बँक ते एम.ई.सी.बी. पर्यंतच्या रोडची’, ‘कोळी आळी रोडची’ आणि ‘हॉटेल मेघ मधूर ते रामगड रोडची’ अवस्थाही नालेसफाईअभावी बिकट झाली आहे. भविष्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यास होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोणाची, असा प्रश्नही संघटनेने उपस्थित केला आहे. भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी शहरातील सर्व नाल्यांची सफाई हंगामापूर्वी होणे गरजेचे आहे, जेणेकरून रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनने मुख्याधिकारी साहेबांना नम्र विनंती केली आहे की, सर्व रस्त्यांची संपूर्ण पाहणी करून यावर ठोस कारवाई करण्यात यावी. नागरिकांना चांगले रस्ते आणि उत्तम सोयी-सुविधा पुरवणे हे नगरपालिकेचे कर्तव्य आहे. जर यावर ठोस उपाययोजना न झाल्यास, मानवाधिकार संघटनेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे तालुका अध्यक्ष श्री. राजेंद्र पवार, उपाध्यक्ष श्री. अशोक मामा शिंदे, रफिक बडाणे आणि इस्माईल वारुणकर हे उपस्थित होते.





