मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे कृषी खात्याच कारभार सोपवण्यात येणार?
सातारा (अली मुजावर )राज्यातील शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील वक्तव्य करणं, राज्यात बळीराजा जीव देत असताना सभागृहात बसून मोबाईलवर ऑनलाइन रमी (पत्ते) खेळणे अशा विविध आरोपांमुळे चर्चेत असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढंच नव्हे तर मकरंद पाटील यांच्याकडे कृषी खात्याच कारभार सोपवण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितल्याचं समजतं.
मकरंद पाटील यांच्याकडे सध्या मदत आणि पुनर्वसन खातं आहे. पाटील यांच्याकडे कृषीमंत्रीपद सोपवल्यानंतर त्यांचं मदत आणि पुनर्वसन खातं हे कोकाटे यांना देणार अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
कित्येक वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणारे, सरकारला अडचणीत आणआणारे माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद काढून न घेता त्यांच्या खात्यात फक्त बदल करून त्यांना अभय दिले जाणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
विधानपरिषदेत रमी खेळणे,शेतकऱ्यांसंदर्भात वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणे यामुळे माणिकराव कोकाटेंविषयी नाराजी वाढलेली आहे. परंतु पहिल्यांदाच त्यांना मंत्री केले असल्याने लगेच त्यांचे मंत्रीपदावरून काढणे योग्य ठरणार नसल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मत असल्याचे समजते.
गेल्या काहीव दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य तसेच सभागृहात रमी खेळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने महायुतीतील मंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे.
तसेच राज्यभरात विविध ठिकाणी कोकाटे यांच्याविरोधात रस्त्यावरती अनेक आंदोलनंही झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा एकंदरच खूप अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली असतानाच आता कोकाटे यांचं मंत्रीपदाचं खात बदलणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच दुसरे मंत्री असलेले मकरंदआबा पाटील यांच्याकडे असलेलं मदत व पुनर्वसन खातं हे कोकाटे यांना मिळू शकतं. तर कृषीमंत्रीपदाची धुरा ही मकरंद पाटील यांच्या खांद्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. असा प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून केला जाईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.





