गौरीशंकरचे डॉ. धैर्यशील घाडगे यांनी बनविलेल्या उपकरणाला जागतिक स्तरावर पेटंट प्राप्त
आधुनिक व नाविन्यपूर्ण उपकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात नवीक्रांती. यु.के (इंग्लंड) देशाने गौरविले
लिंब – औषधनिर्माण क्षेत्रात नाविन्यपूर्ण औषध निर्मिती संशोधना बरोबरच यासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणे बनवणाऱ्या संशोधकांचे ही तितकेच महत्त्व आहे.असेच एक परिणामकारक व अचूक उपकरणाची निर्मिती गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, लिंब महाविद्यालयात एम फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ. धैर्यशील घाडगे तसेच या उपकरणासाठी सहकार्य करणारे डॉ. शैलजा जाधव यांनी नवनिर्मिती केली असून या उपक्रमाच्या साह्याने औषध निर्मिती विशेषता वैद्यकीय क्षेत्रात नवक्रांती घडणार आहे. त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपकरणाची दखल यु. के.( इंग्लंड ) या देशाने घेऊन त्यांना पेटंट देऊन गौरविले आहे.मानवी शरीरात निर्माण होणारे विविध आजार व त्यामुळे शरीरावर होणाऱ्या जखमा या दीर्घकाळ बऱ्या होत नसल्याने रुग्णाला होणारा त्रास कमी करण्यासाठी व त्यावर परिणामकारक व अचूक उपाययोजना करण्यासाठी डॉ.धैर्यशील घाडगे व डॉ. शैलजा जाधव यांनी नवनिर्मिती केलेल्या उपकरणामुळे रुग्णांच्या जखमेवर उपकरणाच्या साह्याने मलमपट्टी करणे सहजपणे शक्य होणार आहे.यामुळे बऱ्याचदा जखमेवर मलम चोळताना होणाऱ्या जंतूंपासून जखम संसर्ग रोखणे या उपकरणामुळे शक्य झाले आहे.त्यामुळे शरीरावर दीर्घकालीन राहणाऱ्या जखमा(मधुमेह,इत्यादी)या लवकरात लवकर पूर्णपणे बरे होण्यास या उपकरणाच्या माध्यमातून शक्य होणार आहे .या उपकरणाचे महत्त्व जागतिक स्तरावर सिद्ध झाले असून डॉ.धैर्यशील घाडगे व डॉ. शैलजा जाधव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. डॉ.धैर्यशील घाडगे यांच्या या नाविन्यपूर्ण उपकरणामुळे गौरीशंकर फार्मसी, लिंब महाविद्यालयाच्या शैक्षणिक शिरपेचात त्यांनी मानाचा तुरा रोवला आहे.
त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांचा गौरीशंकर फार्मसी लिंब महाविद्यालयात संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर व प्राचार्य डॉ.संतोष बेल्हेकर यांच्या हस्ते बुके देऊन उचित सत्कार करण्यात आला. डॉ. धैर्यशील घाडगे व डॉ. शैलजा जाधव यांनी अथक परिश्रमातून विविध चाचण्यांच्या आधारे बनवलेल्या *डिझाईन फॉर ए नॅनोइन्फ्युज्ङ वुंड ड्रेसिंग डिस्पेन्सर* या मेडिकल साठी अत्यंत उपयोगी ठरणाऱ्या व विशिष्ट पद्धतीने डिझाईन केलेल्या उपकरणाची *यु. के. ( इंग्लंड)* यांनी विशेष दखल घेतली आहे. त्यांच्या या उचित कामगिरी मुळे गौरीशंकरच्या संशोधनात्मक क्षेत्राला त्यांनी गती दिली असून संस्थेचा नावलौकिक डॉ.धैर्यशील घाडगे यांनी उंचविला असल्याचे मत गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले आहे.
प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर यांनी ही डॉ धैर्यशील घाडगे यांच्या संशोधनात्मक कार्याची प्रशंसा केली आहे. डॉ. धैर्यशील घाडगे यांच्या उपकरणाला जागतिक स्तरावर पेटंट प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी अभिनंदन केले. –
गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, लिंब येथे गेली १७ वर्षापासून कार्यरत असणारे डॉ. धैर्यशील घाडगे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध सेमिनार मध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील विविध शोधनिबंध त्यांचे जागतिक स्तरावर नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत. कॅन्सर व क्षयरोग या दुर्धर आजारावर त्यांनी नाविन्यपूर्ण संशोधन केलेले आहे. याची जागतिक स्तरावर दखल घेऊन त्यांना पेटंट देऊन गौरविले आहे. औषध निर्मिती करताना प्रयोगशाळेत रसायनाचे अचूक मिश्रण होण्यासाठी उपकरणाचे खूप महत्त्व असते. नाविन्यपूर्ण औषधांचे परिणामकारक फलप्राप्तीसाठी डॉ.धैर्यशील घाडगे व डॉ.शैलजा जाधव यांनी बनविलेले उपकरण या पुढील काळात सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे.




