पेठपार अपघात: अज्ञात वाहनचालकाचा शोध मंदावला, ग्रामस्थांचे पोलीस ठाण्यावर निवेदन; मृताच्या कुटुंबीयांना न्यायाची प्रतीक्षा
महाबळेश्वर, दि. २० जून: महाबळेश्वर तालुक्यातील पेठपार येथे गेल्या आठवड्यात (दि. ८ जून, रविवार) रात्री झालेल्या भीषण अपघातात वृद्ध पादचारी बापू लक्ष्मण जाधव (वय ७०) यांचा जागीच मृत्यू होऊन १२ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर माणुसकीला काळिमा फासत अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला होता. महाबळेश्वर पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी, अद्याप पोलिसांच्या हाती कोणतेही ठोस धागेदोरे लागलेले नाहीत, त्यामुळे तपासाची गती संथ असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, पार-पार, पेठपार आणि सोंडपार येथील ग्रामस्थांनी महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सांडभोर साहेब यांना सह्यांचे निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी गतीने करून मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
घटनेनंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असली तरी, १२ दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी किंवा वाहनाबाबत कोणतीही महत्त्वाची माहिती मिळालेली नाही. पोलीस ठाण्यापासून सुमारे २० किलोमीटर पश्चिमेकडील हे घटनास्थळ असून, महाबळेश्वर पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक रौफ ईनामदार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मात्र, तपासाची ही संथ गती पाहता, मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यास आणखी किती वेळ लागेल, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
ग्रामस्थांचे निवेदन आणि न्यायाची मागणी
पारपार, पेठपार आणि सोंडपार येथील ग्रामस्थांनी एकत्रित येत महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सांडभोर साहेब यांना ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन सादर केले आहे.यावेळी सुभाष सोंडकर, सुभाष भाऊ सोंडकर, जगन्नाथ शेटे(उपसरपंच ग्रा. पारपार), नितीन सोंडकर (पो.पा.सोंङपार),अर्चना शेटे (पो. पा. पेठपार),गौरी मोरे(पो.पा.पारपार), प्रकाश सोंडकर,बबन सोंङकर,विजय ङांगे, गणेश सोंडकर, प्रभाकर सोंडकर,सुनील तात्या, चंद्रकांत सोंडकर, काशिनाथ सोंडकर, रामभाऊ सपकाळ, संजय मोरे, राजू सोंडकर,भिकन जाधव तसेच इतर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “पार गावचे ग्रामस्थ कै. बापू लक्ष्मण जाधव रा. सोंडपार यांना पेठपार हद्दीत (गावाजवळ) अज्ञात गाडीवाल्याने उडवले असता, त्यांचा जागीच मृत्यू झाला. या बाबत आपले खात्यामार्फत चालू असलेल्या चौकशीबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.” या निवेदनात सर्व ग्रामस्थ आणि मृत व्यक्तीचे कुटुंबीय यांनी योग्य ती चौकशी होऊन न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या घटनेमुळे पार परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.मृताच्या धार्मिक विधी वेळी उपस्थित परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थ आणि समाज बांधवांनी या घटनेबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या असुन अज्ञात वाहनचालकाला लवकरात लवकर शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व समाजाने केली आहे. मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी मागणी पार परिसरात जोर धरत आहे.
