महाबळेश्वर नगरपरिषद शाळांचा कायापालट: अत्याधुनिक सुविधांसह विद्यार्थ्यांचे स्वागत; पीएमश्री योजनेअंतर्गत खगोलशाळेचे उद्घाटन.
महाबळेश्वर: “महाबळेश्वर नगरपरिषद शाळा आता केवळ शाळा राहिल्या नसून, त्या दर्जात्मक शिक्षण आणि गुणवत्तेचे केंद्र बनल्या आहेत,” असे प्रतिपादन महाबळेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी केले. नगरपरिषदेच्या शाळा क्र. १ आणि २ मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नगरपरिषदेच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले. या चिमुकल्यांच्या ज्ञानमंदिराच्या पहिल्या पावलाचे ठसे आठवण म्हणून पालकांना भेट देण्यात आले, हा क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.
यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना दाखल करण्याचे आवाहन करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशिनी नागराजन यांचे पत्र पालकांना वितरीत करण्यात आले. तसेच, पहिलीमध्ये दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, मोजे, पाठ्यपुस्तके आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
शाळांचा कायापालट आणि अत्याधुनिक सुविधा
मागील शैक्षणिक वर्षात महाबळेश्वर नगरपरिषदेने शाळांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. यामध्ये आकर्षक आणि सुसज्ज शालेय इमारती, अभ्यासक्रमावर आधारित ‘बाला’ पेंटिंग्ज, विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार बेंच, डिजिटल क्लासरूम, इंटरनेट सुविधा, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक वर्गात आणि शालेय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध स्पर्धा आणि क्रीडा महोत्सवांचेही आयोजन करण्यात येत आहे. या सर्व सुविधांमुळे नगरपरिषदेच्या शाळा खासगी शाळांना तोडीस तोड बनल्या आहेत.
खगोलशाळेचे उद्घाटन
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे, पीएमश्री योजनेअंतर्गत न.पा. शाळा क्र. २ मध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक आणि सुसज्ज खगोलशाळा वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून मिळणार आहे.
मुख्याधिकारी पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “नगरपरिषदेने आपल्या शाळांमध्ये अत्याधुनिक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता महाबळेश्वरच्या प्रत्येक नागरिकाने आपल्या पाल्याला नगरपरिषद शाळेत दाखल करण्याची जबाबदारी घ्यावी. तसेच, प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी १००% योगदान देणे हे आपले कर्तव्य आहे.”
या कार्यक्रमाला नगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक आबाजी ढोबळे, अर्बन बँकेचे व्यवस्थापक फकीरभाई वलगे, सेवानिवृत्त वरिष्ठ मुख्याध्यापक संजय ओंबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ डोईफोडे, पत्रकार राहुल शेलार, दत्ता वागदरे दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाळा क्र. १ च्या मुलांनी सादर केलेल्या ईशस्तवनने झाली, तर शाळा क्र. २ च्या पहिलीतील चिमुकल्यांनी सुरेल बालगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत गोळे यांनी केले, संतोष शिंदे यांनी सूत्रसंचालन केले आणि जनार्दन कदम यांनी आभार मानले.
