खांद्यावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया साताऱ्यात यशस्वी
सातारा, दि. १४ : उतार वयात खांद्याचे स्नायू जीर्ण होऊन फाटल्यामुळे रुग्णाला हात खांद्याच्या वर उचलणे जिकीरीचे होते. साताऱ्यातील अशाच एका ५० वर्षीय महिलेच्या खांद्यावर गुंतागुंतीची रोटेटर कफ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. स्थानिक डॉक्टरांनी केलेली साताऱ्यातील ही पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया आहे.
सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुडघा आणि खांद्याचे स्पेशालिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. कपिल जगताप यांनी ही किमया साधली. त्यांनी सांगितले की, खांद्याच्या हालचालीसाठी त्याच्या भोवती चार स्नायु असतात. त्यांना रोटेटर कफ (Rotator Cuff) म्हटले जाते. आपला हात डोक्याच्या वरती घेऊन जाण्याचे काम हे स्नायू करतात. उतार वयामध्ये हे स्नायू जीर्ण होऊन व आजूबाजूच्या हाडाला घासून फाटू शकतात. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती हातावर पडली तर दोन्ही हाडांच्या मध्ये सापडून रोटेटर कफ टीयर होण्याची शक्यता वाढते.
संपूर्ण स्नायू फाटला असेल तर तो स्वतःहून जुळून येत नाही. फाटलेला स्नायू दुर्बिणीद्वारे (अर्थोस्कॉपिक सर्जरी) हाडांमध्ये अँकरच्या मदतीने पुन्हा शिवून घेतला जातो. रुग्ण महिलेबाबत अर्थोस्कॉपिक सर्जरीद्वारे छोटे छोटे चिरे देऊन संपूर्ण शस्त्रक्रियेची प्रक्रिया करण्यात आली. अर्थोस्कॉपिक सर्जरीमुळे मोठी जखम टाळता येते. त्यामुळे संभाव्य रक्तस्त्रावही टळतो. त्याचबरोबर शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला लवकर आराम पडून रुग्ण पुन्हा आपल्या हाताने पूर्वीसारखी कामे करू शकतो, असेही डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले.
डॉ. कपिल जगताप यांना या ऑपरेशन कामी डॉ. निलेश साबळे, डॉ. सुधीर पवार, सोमनाथ पवार, शुभम साळोखे, हेमलता भिसे व अंकिता सोळसकर या टीमने सहकार्य केले. सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाचे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहे. या ठिकाणी मायनर आणि मेजर अशी दोन ऑपरेशन थिएटर उपलब्ध आहेत. त्यामुळे एका वेळी दोन शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात. जंतू प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हीपा फिल्टरचा उपयोग केला जातो, अशी माहिती हॉस्पिटल व्यवस्थापनाने दिली.
डॉ. कपिल जगताप यांनी या प्रक्रियेचे प्रदीर्घ प्रशिक्षण पुण्याच्या संचेती आणि साऊथ कोरिया मधील ईव्हा युनिव्हर्सिटीत घेतले आहे. जागतिक दर्जाचे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सातारा डायग्नोस्टिक सेंटर मध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ही सेवा डॉ. जगताप यांच्यामार्फत आता सातारकरांना माफक दरात उपलब्ध झाली असल्याचे सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक व चेअरमन डॉ.सुरेश शिंदे यांनी सांगितले.
