जागतिक पर्यावरण दिन २०२५: महाबळेश्वरमध्ये प्लास्टिकमुक्ती आणि वृक्षारोपण कार्यक्रमांचा बोलबाला
महाबळेश्वर: पर्यावरण व वातावरणीय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आणि महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेमार्फत, प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जागतिक पर्यावरण दिन २०२५ (५ जून) निमित्त २२ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत महाबळेश्वर शहरात विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांची सांगता आज, ‘जागतिक पर्यावरण दिनी’, “जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन” या संकल्पनेवर आधारित आणि माझी वसुंधरा ६.० अंतर्गत आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमांनी झाली.
यानिमित्ताने, महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद संचलित गिरीस्थान प्रशालेच्या ५८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आणि ‘एक पेड मा के नाम अभियान’ अंतर्गत, गिरीस्थान प्रशाला मैदान आणि ग्लेन ओगल धरण परिसर, महाबळेश्वर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला गिरीस्थान प्रशालेचे प्राचार्य श्री. माने सर, माजी प्राचार्य श्री. ढाणक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच प्रशालेचे अनेक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक श्री. आबाजी ठोबळे, कर निरीक्षक व प्रशासकीय अधिकारी श्री. अमित माने, अंतर्गत लेखापरीक्षक श्री. सचिन कदम, आरोग्य निरीक्षक श्री. प्रमोद कुंभार, स्थापत्य अभियंता श्री. मुरलीधर धायगुडे, वृक्षाधिकारी श्री. कल्याण हिवरे आणि सहायक प्रकल्प अधिकारी श्री. संतोष दड यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
या वृक्षारोपण मोहिमेमुळे महाबळेश्वर शहरात हरित आच्छादन वाढण्यास मदत होणार असून, प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन करण्याच्या जागतिक प्रयत्नांनाही बळकटी मिळणार आहे. महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.
