टोमॅटोचा भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल
सातारा -टोमॅटो पिकाचा बाजार मागील काही आठवड्यांपासून कमी झाला आहे. बाजारातील आवक वाढल्यानंतर भाव पडले. भाव पडल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या टोमॅटोचा बाजारभाव अभावी लाल चिखल झाला आहे. भाव गडगडल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
३० रुपये ते ७० रुपये २० किलोच्या प्रतिकॅरेटचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी जगायचं कसं, असा सवाल टोमॅटो उत्पादकांमधून उपस्थित केला जात आहे.टोमॅटोचे पीक नगदी व भांडवली असल्याने लागवडीपासून काढणीपर्यंत मोठा खर्च होतो. पण सध्या टोमॅटो पिकाला बाजारभाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असून लाखो रुपये भांडवल घालून पोटच्या पोराप्रमाणे पिकलेली टोमॅटो शेती बाजारात कवडीमोल झाल्यामुळे शेवटी पिकाला विळा लावण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. टोमॅटोचे भाव घसरल्याने आर्थिक नुकसान होत आहे.
