बाबा सिद्दीकी यांचा मारेकरी झीशान अख्तरला अटक; पंजाब पोलिसांची मोठी कारवाई
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या कार्यालयाबाहेर निर्घृणपणे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. आता मात्र पोलिसांना मोठी कारवाई केली आहे. पंजाब पोलिसांनी बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्याला अटक केली आहे. झीशान अख्तर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येने संपूर्ण मुंबई हादरली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपींमध्ये शुभम लोणकर आणि झीशान अख्तर यांचा समावेश आहे. झीशान अख्तरच्या सांगण्यावरून बाबा सिद्दीकीची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की, झीशान अख्तर आणि शुभम लोणकर हे दोघेही बाबा सिद्दीकीची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना सूचना देत होते.पंजाबमधील जालंधर येथे अटक
मुंबई पोलिस गेल्या अनेक महिन्यांपासून झीशान अख्तरचा शोध घेत होते. त्याला पंजाबमधील जालंधर येथून अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा बिश्नोई टोळीच्या सदस्यांनी पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मनोरंजन कालिया यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व आरोपी पाकिस्तानचे होते. या आरोपींपैकी एकाचे नाव झीशान अख्तर आहे.
