वर्ये ते लिंब खिंड रस्त्याचे रुंदीकरण,वाहने सुसाट अपघाताचा धोका वाढला सुरक्षिततेची उपाययोजना गरजेची
लिंब :- सातारा पुणे जुना हायवे मार्गावरील वर्ये ते लिंबखिंड पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण झाल्याने या मार्गावरून वाहने सुसाट धावत आहेत. परिणामी या मार्गावर अपघाताचा धोका आता वाढला आहे, त्यामुळे या ठिकाणी सुरक्षिततेची उपाययोजना करणे गरजेचे आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा पाहता वाहन चालकासाठी सूचनाफलक मार्गावर लावणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रशासनाने या ठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.
लिंब खिंड ते वर्ये पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे होते या मार्गावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रशासनाने या मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण केले आहे. रस्ता रुंद झाल्याने या मार्गावरील वाहतुकीची होणारी कोंडी दूर झाली आहे. त्यामुळे वाहन चालकामधून समाधान व्यक्त केले जात आहे .
लिंबखिंड ते वर्ये पर्यंतचा रस्ता तीव्र उताराचा आहे या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण झाल्याने रस्ता रुंद झाला आहे, परिणामी वाहन चालक या मार्गावरून वाहने वेगाने चालवीत आहेत. या ठिकाणी विविध महाविद्यालये व शैक्षणिक संस्था असल्याने या परिसरात विद्यार्थ्यांची ये जा पण मोठ्या प्रमाणात आहे. वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताला येथे निमंत्रण मिळत आहे,या विद्यालयांसमोर प्रशासनाने सुरक्षिततेच्या उपायोजना करणे आवश्यक आहे.
श्रीरंग काटेकर सातारा
