महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंदसिंह मेवाड यांचे निधन
मेवाडच्या राजघराण्याचे सदस्य आणि एचआरएच हॉटेल समूहाचे अध्यक्ष अरविंद सिंह मेवाड यांचे दीर्घ आजारामुळे उदयपूर येथे आज निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांचे ते वंशज होते. उदयपूर येथील सिटी पॅलेसमधील शंभू निवासात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी विजयराज कुमारी, मुलगा लक्ष्यराज सिंह मेवाड, मुलगी भार्गवी कुमारी मेवाड आणि पद्मजा कुमारी परमार असा परिवार आहे. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.
अरविंद सिंह मेवाड हे भगवंत सिंह मेवाड आणि सुशीला कुमारी यांचे कनिष्ठ सुपुत्र होते. त्यांचे मोठे बंधू महेंद्र सिंह मेवाड यांचे मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात निधन झाले होते. अजमेरच्या मेयो महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी ब्रिटनमध्ये जाऊन हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली. तसेच विविध आंतरराष्ट्रीय हॉटेलमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले होते.
एचआरएच ग्रुप ऑफ हॉटेल्सची त्यांनी स्थापना केली होती. त्याआधी त्यांनी बरीच वर्ष शिकागो येथे राहून काम केले. मेवाड यांना क्रिकेट, पोलो आणि संगीतामध्ये ऋची होती. त्यांनी राजस्थानच्या रणजी क्रिकेट संघाचे कर्णधारपदही भूषविले होते. तब्बल दोन दशक त्यांनी क्रिकेटपटू म्हणून मैदान गाजवले.
