बंद फाटक तोडून रेल्वेमार्गावर आलेल्या मालमोटारीला मुंबई-अमरावती एक्स्प्रेसची धडक
जळगाव जिल्ह्यातील बोदवड स्थानकालगतचे बंद फाटक तोडून थेट रेल्वे मार्गावर आलेल्या मालमोटारीला मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते अमरावती एक्स्प्रेस धडकल्याची घटना शुक्रवारी पहाटे पाचला घटली. सुदैवाने रेल्वे गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, अपघातामुळे भुसावळ-नागपूर-हावडा मार्गावरील वाहतूक सकाळपासून ठप्प झाली होती.
बोदवड रेल्वे स्थानकापासून साधारण ५०० मीटर अंतरावर असलेले फाटक उड्डाणपूल उभारण्यात आल्यापासून वापरासाठी बंद केले आहे. त्याबाबत अनभिज्ञ असलेल्या चालकाने त्याच्या ताब्यातील मालमोटार त्या रस्त्याने भरधाव आणली. फाटक बंद असल्याचे अचानक लक्षात आल्यावर त्याने वेगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नही केला.
मात्र, भरधाव मालमोटार तोपर्यंत फाटक तोडून थेट रेल्वे मार्गावर गेली होती. याच दरम्यान, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून अमरावतीकडे जाणारी एक्स्प्रेस बोदवड स्थानकावरून नुकतीच मार्गस्थ झालेली होती. त्यामुळे रेल्वे गाडीचा वेग बऱ्यापैकी कमी होता. त्यामुळे एक्स्प्रेसला थांबवण्यात चालकाला लगेच यश आले. तरीही एक्स्प्रेसचे इंजिन धडकल्याने रेल्वेमार्गावर उभ्या असलेल्या मालमोटारीचा चुराडा झाला. त्यातील गव्हाचे पोते सगळीकडे विखुरले गेले. अचानक ब्रेक दाबण्यात आल्याने एक्स्प्रेसमध्ये झोपलेले अनेक प्रवासी बर्थवरून खाली पडले. अपघात घडल्यानंतर मोटारीचा चालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बोदवड स्थानकावरील अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून, ती सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. जेसीबीच्या साहाय्याने अपघातग्रस्त मालमोटारीसह त्यातील गव्हाचे पोते हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
