शिरवळ मधील नामांकीत असणाऱ्या स्टारसिटी अपार्टमेंट मधील गाळ्यावर शिरवळ पोलिसांनी छापा टाकुन तब्बल १ कोटी ६ लाख रुपयांचा गुटखा केला जप्त
आठ आरोपी विरुद्ध गुन्हा केला दाखल
शिरवळच्या इतिहासात पोलिसांची सर्वात मोठी कामगीरी
वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)शिरवळ पोलिसांनी शिरवळ येथील स्टारसिटी अपार्टमेंटमधील गळ्यात छापा मारून केलेल्या धडक कारवाईमध्ये गुटखा पान मसाला, गुटखा बनविण्याचे मशीन, त्यासाठी लागणारे सुपारी, पावडर, पॅकिंग साहित्य एक चारचाकी वाहन असा एकूण १ कोटी ६ लाख १९ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना अनोखी भेट दिली.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यावर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांना शिरवळमध्ये गुटखा घेऊन जाण्यासाठी वाहन आल्याची गोपनीय माहिती बातमीदारामार्फत मिळाली. यावेळी यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अन्य व औषध प्रशासनाच्या मदतीने गुरुवार दि.६ रोजी शिरवळ मधील स्टारसिटी अपार्टमेंटमध्ये छापा टाकत गुटखा रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाई मध्ये गुटखा पान मसाला ८३ लाख १९ हजार २७० रुपये, गुटखा बनवण्याचे मशीन व लागणारे सुपारी, पावडर, पॅकिंग साहित्य व आवश्यक मशीन असा १८ लाख ५० हजार रुपये व एक चारचाकी वाहन ४.५० लाख रुपये असा एकूण १ कोटी ६ लाख १९ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत करण्यात आला.
घटनास्थळी वापरलेले दोन गाळे सील करून या प्रकरणात सुनील पुतन सिंह (रा.नवले ब्रिज पुणे), राहुल हरिलाल देपन (वय-२४वर्षे, रा. नवले ब्रिज पुणे), कन्हैयालाल काळूराम गेहलोत (वय-३०वर्ष) पुष्पेन्द्र अकबाल सिंह (वय-२८वर्ष, रा.नवले ब्रिज पुणे), कामटे (रा. पुणे, पूर्ण नाव माहित नाही), स्टार सिटी सोसायटी शिरवळ येथील बिल्डिंग क्र.१९ मधील दक्षिणेकडून गाळा नं.२मालक, बिल्डिंग क्र.१४ मधील दक्षिणेकडून गाळा नं.३ चे मालक , स्वप्निल नामदेव देवकर (रा.चोरीमळा मु.पो. वडगावआनंद, ता. जुन्नर,जि.पुणे) अशा एकूण आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये शिरवळ पोलीस स्टेशनचे पो.नि. यशवंत नलवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिंदे पोलीस अंमलदार शशिकांत भगत, धरमसिंग पावरा, सुधाकर सूर्यवंशी, तुषार कुंभार, सचिन वीर, सुरज चव्हाण, अरविंद बाऱ्हाळे, भाऊसाहेब दिघे, दीपक पालेपवाड, तुषार अभंग, अजित बोराटे, सुधाकर सपकाळ व अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे, अधिकारी वंदना रुपनवर, इम्रान हवालदार, प्रियंका वाईकर यांचे सहकार्य लाभले.
खंडणी मागणाऱ्यांवर कारवाई करू
शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे व व्यावसायिकांच्या त्रुटी शोधून त्यांच्याकडे खंडणी मागण्यासारखे प्रकार होत असल्यास याबाबतची माहिती पोलिसांना कळवावी. नाव गोपनीय ठेवून संबंधितांवर क्वचित कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्याद्वारे करण्यात आले.
कोणाच्या वरदहस्ताने गुटखा कारखाना सुरू होता .
शिरवळ मधील स्टार सिटी सारख्या गजबजलेल्या परिसरामध्ये गुटखा कारखाना दिवसाढवळ्या इतक्या दिवसांपासून सुरू असूनही आजपर्यंत याबाबतची माहिती कोणालाच कळाली नसल्याने या गुटका कारखान्यासाठी कोणाचा वरदहस्त आहे? यामागचे खरे सूत्रधार समोर येणार का ? याची उत्सुकता शिरवळ परिसरातील ग्रामस्थांना लागली आहे.
