महिला दिनानिमित्त उत्कर्ष पतसंस्था वाई च्या वतीने गिर्यारोहण स्पर्धेचे आयोजन
वाई प्रतिनिधी -महिला दिनानिमित्त उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई यांच्या वतीने ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक ६.३० वाजता विशेष गिर्यारोहण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या शारीरिक सक्षमतेला चालना देण्यासाठी आणि साहसी खेळांमध्ये त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.
ही स्पर्धा वाई मधील सोनजाई डोंगर येथे पार पडणार असून, विविध वयोगटांतील महिलांसाठी खुली आहे. सहभागींसाठी विशेष मार्गदर्शन तसेच आवश्यक सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महिलांनी या संधीचा लाभ घेत वेगळ्या पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या महिला दिनाच्या या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक असून ही स्पर्धा विनाशुल्क घेण्यात आलेली आहे, नावनोंदणी साठी संस्थेच्या ८६८७१००१०० यावर महिलांनी संपर्क साधावा. स्पर्धा वय वर्षे २१ ते ३०, ३१ ते ५०, ५१ ते ६० व ६० वर्षावरील महिला अश्या पाच वेगवेगळ्या गटात संपन्न होणार आहे. प्रत्येक गटात ३ विजेत्यांना आकर्षक बक्षिसे, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे देण्यात येणार असून, सहभागी प्रत्येक महिलेला देखील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. महिलांनी आपल्या शारीरिक व मानसिक ताकदीची परीक्षा घेण्यासाठी आणि साहसी अनुभव मिळवण्यासाठी या स्पर्धेत सहभागी व्हावे.
“स्त्रीशक्तीचा सन्मान आणि आत्मविश्वासाचा नवा अध्याय” घडवण्यासाठी या साहसी उपक्रमाचा एक भाग बना!
