अमेरिकेत मृत्युशी झुंजणाऱ्या लेकीला पाहण्यासाठी वडिलांनी मध्यरात्रीच गाठलं हॉस्पिटल
उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेल्या कराड तालुक्यातील उंब्रज गावच्या नीलम तानाजी शिंदे या तरुणीचा भीषण अपघात झाल्यानं ती कोमात आहे. इमर्जन्सी व्हिसा मिळताच लेकीला भेटण्यासाठी वडिलांनी अमेरिका गाठली.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज या गावाची नीलम शिंदे ही तरुणी कॅलिफोर्निया येथे गेल्या चार वर्षांपासून शिकत आहे. तिचा 14 फेब्रुवारी रोजी भीषण अपघात झाला. तिच्यावर सॅक्रामेंटोच्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेली अनेक दिवस अमेरिकेला जाण्यासाठी तिचे वडील तानाजी शिंदे इमर्जन्सी व्हिसासाठी प्रयत्न करीत होते. अखेर नीलमला भेटण्यासाठी तिचे वडील तानाजी शिंदे आणि मामेभाऊ गौरव कदम यांना आपत्कालीन परिस्थितीत अमेरिकेचा व्हिसा अखेर मंजूर झाला. काल सोमवारी मध्यरात्री वडील व भाऊ अमेरिकेत दाखल झाल्यानंतर त्यांनी नीलमची दवाखान्यात जाऊन भेट घेतली.
नीलमचा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेत व्यायामासाठी चालत असताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून तिला जोरदार धडक दिली. या अपघाताला दोषी असलेल्या कारचालकाला पोलिसांनी पकडले आहे. या अपघातात नीलमच्या डोक्याला आणि दोन्ही हातापायांना दुखापत झाली आहे. तिच्या छातीलाही मार लागला असल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. तिचे वडील व मामाचा मुलगा सॅकरामेन्टोला निघाल्यानंतर सोमवारी मध्यरात्री ते पोहोचले. भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री साडेअकरानंतर नीलमवर उपचार करणारे डाॅक्टर तिच्या कुटुंबीयांशी बोलून उपचारांची पुढील दिशा ठरविणार आहेत.
