सह्याद्री साखर कारखान्यातून बाळासाहेब पाटील यांना बाहेरचा रस्ता दाखवणार भाजपचे आ.मनोज घोरपडेंचा गर्भित इशारा
सातारा (अली मुजावर )सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांनी चालविलेला मनमानी कारभार संपविण्यासाठी सभासदांनी आता गावोगावी जोरदार मोहीम सुरू केली आहे.ज्या पद्धतीने विधानसभेला जनतेने ही निवडणूक हातात घेतली तसेच कारखाना निवडणुकीमध्ये सुद्धा सभासद ही निवडणूक हातात घेऊन सर्वसामान्य घरातील संचालक व चेअरमन या कारखान्यावर राहातील. बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची सह्याद्री साखर कारखाना हा प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टी मधून यांना बाहेर काढू असा गर्भित इशारा आमदार मनोजदादा घोरपडे यांनी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना दिला आहे. सर्वसामान्य सभासदांना न्याय देणे गरजेचे असल्याचे यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले. येणाऱ्या निवडणुकीत सह्याद्री कारखान्यावरती सर्वसामान्य घरातील शेतकरी चेअरमन झाल्याचे दिसून येईल. सह्याद्री कारखान्यावरती येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यास सह्याद्री साखर कारखाना हा माझ्या स्वतःच्या मालकीचा आहे अशी वागणूक आम्ही देणार आहोत असे आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले. याबाबत लवकरच धोरण ठरवण्याबरोबरच मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कराड उत्तर येतील महत्त्वाची संस्था असणाऱ्या सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक येत्या काही दिवसात होणार असून या ठिकाणी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांची सत्ता असून बाळासाहेब पाटील यांना सत्ता टिकवणे अवघड असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
