पंचगंगेच्या उगमस्थानी राजमाता जिजाऊंचा जयंती महोत्सव: सौ.भक्तिताई डाफळे यांचा सन्मान
महाबळेश्वर: महाराष्ट्राच्या जीवनवाहिनी पंचगंगा नद्यांच्या उगमस्थानी असलेल्या ऐतिहासिक पवित्र स्थळी महाबळेश्वर येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या ३६०व्या सुवर्णतुला दिनाचे औचित्य साधून भव्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. दि. २९ जानेवारी २०२५ रोजी शिवप्रेमी मित्र मंडळ आणि श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव साजरा केला जाणार आहे.
यावेळी सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे मार्मिक व्याख्यान होणार असून, जिजाऊ माँसाहेब यांची प्रतिकृती तुला पूजन आणि अभिषेक पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर शिवशाहीर चंद्रकांत माने यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या पोवाड्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे.
विशेष म्हणजे, यावेळी सौ. भक्तिताई डाफळे यांना राजमाता जिजाऊ सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.शिवप्रेमी मंडळ, महिला मंडळ, बचत गट आणि समस्त क्षेत्र महाबळेश्वर ग्रामस्थांनी या ऐतिहासिक सोहळ्यास सर्व शिवभक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
