प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सातारा जिल्ह्यासाठी ४५,४२२ घरकुलांचे विक्रमी उद्दिष्ट-मंत्री जयकुमार गोरे
सातारा -प्रधानमंत्री आवास योजना हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी (Flagship) कार्यक्रम असून समाजातील सर्वात गरीब व भुमीहीन घटकांना स्वतःचे हक्काचे पक्के घर उपलब्ध करुन देणे हे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याचा ग्रामविकास व पंचायतराज विभाग अहोरात्र प्रयत्न करत आहे.याचाच भाग म्हणून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापना झाल्यानंतर लगेचच १०० दिवसांचा कृत्ती कार्यक्रम जाहीर केला.
यानुसार सातारा जिल्ह्यासाठी 45 हजार अधिक घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे, अशी माहिती ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यामध्ये जावली 2579, कराड 6541, खंडाळा 1833, खटाव 4598, कोरेगाव 4146, महाबळेश्वर 1118, माण 3254, पाटण 9279, फलटण 3928, सातारा 5956 व वाई 2190 असे एकूण 45 हजार 422 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.घरकुल बांधकामाच्या केंद्र व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना आहेत. त्यासाठी ग्राम विकास विभाग, पाणीपुरवठा, स्वच्छता विभाग व रोजगार हमी योजना विभाग यांच्या अभिसरणातून साधारण 1 लाख 58 हजार 730 इतके अनुदान देण्यात येते. प्राप्त झालेल्या उद्दिष्टानुसार ४५,४२२ घरकुलांना १०० दिवस कार्यक्रमाअंतर्गत तात्काळ मंजुरी देऊन पहिला हप्ता वितरीत करुन कामे सुरु करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत.
या योजनेस गती देण्यासाठी मागील आठवड्यात पुणे येथे विभागस्तरावर मी स्वतः आढावा घेतला आहे. इतर जिल्ह्यांनाही सूचना दिल्या आहेत.घरकुलाचा हप्ता वितरीत करताना लाभार्थ्याची कोणतीही आर्थिक पिळवणुक होणार नाही तसेच अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पंचायत समितीच्या दर्शनी भागात या संदर्भाने फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंडित दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना अंतर्गत भुमीहीन बेघर लाभार्थ्यांना घरकुलासाठी ५०० चौरस फुट मर्यादेत रुपये १ लाखापर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येते. याचा फायदा लाभार्थ्यांनी घ्यावा, असेही आवाहन ग्रामविकास मंत्री श्री.जयकुमार गोरे यांनी केले आहे.यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन उपस्थित होत्या.




