पुढील दिशा ठरविताना सिंहावलोकन करणे गरजेचे !– डॉ. शिवाजीराव पाटील
शासकीय कृषी महाविद्यालय, कराड येथे मागे वळून पाहताना कार्यक्रमाचे आयोजन!
सातारा -विचारांचे सामर्थ्य फार मोठे आहे. सकारात्मक व योग्य रचनात्मक चिंतनामधून उत्तम गोष्टी घडून येत असतात. वैयक्तिक व सामाजिक जीवनामध्ये यशाची प्राप्ती करणे हे प्रत्येक व्यक्तीचे ध्येय असते. त्यासाठी सिंहावलोकन करून मागील आढावा घेऊन योग्य दिशा व पुढील नियोजन ठरविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव पाटील यांनी केले. सन २०२५ या नूतन वर्षाच्या प्रारंभी आयोजित केलेल्या “मागे वळून पाहताना” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये प्रथमच आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमाला महाविद्यालयामधील तसेच कराड येथील कृषी संशोधन केंद्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कराड येथील शासकीय कृषी महविद्यालयाची स्थापना सन २०१३ मध्ये करण्यात आली. या महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य या नात्याने गेल्या ११ वर्षामध्ये महाविद्यालयाने साध्य केलेल्या प्रगतीचा आढावा घेण्याच्या उद्देश्याने “मागे वळून पाहताना” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली. महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास होऊन ते विश्व कृषी महाविद्यालय व्हावे ही सद्भावना प्रत्यक्षात उतरण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा जपणे व त्याप्रमाणे कार्य करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त, प्रामाणिकपणा, कष्ट घेण्याची तयारी व सामाजिक मुल्ये जपली पाहिजेत. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत:चे व कुटुंबाचे आरोग्य जपत कामावर निष्ठा व प्रेम करावे असे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य असलेले डॉ. पाटील हे सध्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. मागील वर्षामध्ये जमीन हस्तांतरण व जमीन विकास, प्रयोगशाळा बळकटीकरण, व्याख्यान कक्षामध्ये ई-सुविधा निर्मिती, महाविद्यालयासाठी संरक्षित भिंत उभारणी, पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचे बळकटीकरण, विकास कामामध्ये अडथळा ठरत असलेली अनावश्यक वृक्षतोड अशा विविध कामे महाविद्यालयामध्ये हाती घेण्यात आली. महाविद्यालयामध्ये पायाभूत सुविधा उभारणीसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध होणेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्य प्रतिनिधी, जिल्हा विकास निधी अशा विविध माध्यमामधून प्रयत्न चालू असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या विकासासाठी व पायाभूत शैक्षणिक सुविधा निर्मितीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. पी. जी. पाटील यांचे मार्गदर्शन व त्यांच्याकडून विशेष आर्थिक सहाय्य हे अत्यंत मोलाचे ठरत असल्याचे डॉ. शिवाजीराव पाटील यांनी नमूद केले. मागील वर्षामध्ये महाविद्यालय बळकटीकरणासाठी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. पी. जी. पाटील यांनी केलेले विशेष मार्गदर्शन व निधी उपलब्धतेसाठी केलेल्या सहकार्याबद्दल डॉ. शिवाजीराव पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त कली. त्याचबरोबर विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषी) तथा संचालक, शिक्षण, कुलसचिव, नियंत्रक तसेच विद्यापीठ अभियंता व इतर वरिष्ठ यांनी दिलेले पाठबळ याबद्दल डॉ. शिवाजीराव पाटील यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी सन २०२५ मध्ये महाविद्यालय विकासासाठी करावयाची नियोजित कामे याबद्दल डॉ. शिवाजीराव पाटील यांनी अधिकारी-कर्मचारी यांना मार्गदर्शन केले व पुढील विकासकामांची दिशा ठरवून दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयामधील सर्व विषय शाखाप्रमुखांनी मागील वर्षभरातील आढावा व पुढील नियोजन यांविषयी माहिती दिली.राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. इंदिरा घोनमोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सहाय्यक कुलसचिव डॉ. सुनिल अडांगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.