यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये पै. साहेबराव पवार यांचा जन्मशताब्दी अभिष्टचिंतन सोहळा संपन्न समाजमनाच प्रबोधन करणारी मंडळी हीच ऊर्जा स्रोत: प्रा. दशरथ सगरे
यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, तालीम संघाचे अध्यक्ष पै. साहेबराव पवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे होते.
पै. साहेबराव पवार यांचा जीवनपट उघडून पाहताना यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील विद्यार्थी आणि शिक्षक भारावून गेले. यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे म्हणाले, आयुष्यभर समाजकारणासाठी, कुस्ती क्षेत्रासाठी आणि शैक्षणिक बदलांसाठी कार्य केलेले भाऊ हे सातारासाठी एक विलोभनीय असे व्यक्तिमत्व म्हणून लाभले आहेत. शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या शंभर वर्षांच्या कारकीर्दीचा आणि समाज हिताच्या उपक्रमांचा आदर्श घेऊन तशाच प्रकारचे व्यक्तिमत्व बनवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. भाऊंच्या प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्वामुळे आणि देहबोलीमुळे उपस्थितांना एक अनोखी पर्वणी मिळाल्याचे पहावयास मिळाले.
यावेळी पैलवान साहेबराव पवार यांनी तरुण वर्ग आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना आपल्या शालेय जीवनापासून ते राजकीय सामाजिक कारकीर्दीपर्यंत वाटचालीचा प्रवास उपस्थित समोर मांडला, फरकोटीची स्मरणशक्ती असलेल्या भाऊंनी यशोदा इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक कार्याचा आणि प्रा. दशरथ सगरे यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा कौतुकास्पद उल्लेख केला.
त्यांनी अत्यंत उगवत्या वाणीमध्ये आई-वडिलांना सांभाळण्याचे, जिद्दीने वागण्याचे, व्यवहार ज्ञान घेण्याचे, आणि प्रपंच नेटका करण्याचे मार्गदर्शन उपस्थितांना केले. . यावेळी भाऊंच्या शंभराव्या वर्षातील पदार्पणाबद्दल यशोदा इन्स्टिट्यूट च्या वतीने समान पत्र देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी सुधीर नाना पवार, चंद्रकांत सुळ, वैभव फडतरे, जीवन कापले, मदनराव पवार, राजेश्वर पवार, संजय शेलार, संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्वच मान्यवरांचा स्वागत सत्कार यशोदा टेक्निकल कॅम्पस चे कुलसचिव, संचालक, प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसंचालक यशोदा टेक्निकल कॅम्पस यांनी केले.




