पंचायत समिती महाबळेश्वर येथे १० वा आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा.
पार्वतीपुर पार;शुक्रवार दि.२१ जून २०२४ रोजी पंचायत समिती महाबळेश्वर येथे गट विकास अधिकारी अरूण मरभळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.गटविकास अधिकारी सुनील पारठे, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.कविता खोसे यांच्या उपस्थितीत १० वा आंतरराष्ट्रीय योगदिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला..
महाबळेश्वर तालुका क्रीडासमन्वयक श्री.श्रीगणेश शेंडे सर यांनी उपस्थित योग मार्गदर्शकांचे व सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. श्रीगुरुवंदना करून योगगुरू दीपक कदम यांनी योगदिन कार्यक्रमाची प्रोटोकॉलप्रमाणे सुरुवात केली. आर्ट ऑफ लिव्हिंग, महाबळेश्वरचे संस्थापक अध्यक्ष व योगप्रशिक्षक राजन ढेबे यांनी योग म्हणजे काय? अष्टांग योग, योगाची पार्श्वभूमी, योगाचे महत्व, यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. योगसाधना करण्यापूर्वी करावयाच्या उत्तेजक हालचाली क्रमबध्दरीतीने करून घेतल्यानंतर त्यांनी मान, खांदे, कटी संचालन, उत्कटासन, वृक्षासन, ताडासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन अशी उभी राहून करावयाच्या आसनांची प्रात्यक्षिके करून घेतली. त्यानंतर बसून करावयाच्या आसनांमध्ये भद्रासन, वज्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, पद्मासन उत्तानमंडूकासन, वक्रासन, इ. आसनांची योग्य स्थिती व फायदे सांगितले. त्यानंतर सर्वांगसुंदर व्यायामप्रकार अर्थात सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकासह घेण्यात आला.
योगगुरू दीपक कदम यांनी सूक्ष्मयोगाचे फायदे सांगत सूक्ष्मयोगा करवून घेतला. त्यामध्ये मस्तकापासून पाऊलापर्यंत स्वतः आपापल्या शरीराचा मसाज करून शारीरिक जाण निर्माण केली. नंतर सरांनी विविध प्राणायामाची प्रात्यक्षिके घेतली. नाडीशोधन, भ्रामरी, शीतली, स्ट्रॉ, इ.प्रकारचे प्राणायाम घेऊन अखेरीस भस्रिका व पंचकोश ध्यान घेतले. त्यानंतर सर्वांना ध्यानमग्न अवस्थेतून सजग होण्यासाठी सूप्तसूचना देऊन शरीर विषयक जाणीव देण्यात आली. सरतेशेवटी संकल्प व शांतीपाठ झाल्यानंतर योगदिन कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रमाचे संयोजक गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी सर्वांना योगदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. योग का करावा? याबाबत सुश्राव्य असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक गट विकास अधिकारी अरूण मरभळ यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करीत केवळ योगदिनी योग न करता दैनंदिन जीवनाचा तो एक हिस्सा व्हावा, असे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीगणेश शेंडे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील पारठे यांनी मानले..
