जिल्ह्यातील ३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी अग्रीमचे पाच हजार रुपये जमा– जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा, दि. १२ : सातारा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना शासनामार्फत दिवाळी अग्रीम म्हणून प्रति शेतकरी ५ हजार रुपये थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे वितरित करण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले होते, अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम थेट वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.
ई-पंचनामा पोर्टलवरील आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण ४ लाख ४०५ पात्र शेतकरी लाभार्थी शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले आहेत. यापैकी ३ लाख २ हजार ७७७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी अग्रीमचे प्रत्येकी ५ हजार रुपये जमा झाले आहेत.
ज्या पात्र शेतकऱ्यांना अद्याप दिवाळी अग्रीमची रक्कम मिळालेली नाही, त्यांना काळजी करण्याचे कारण नाही. अशा सर्व वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ई-पंचनामा प्रक्रियेद्वारे शासन निर्णयातील विहित निकष आणि दरानुसार सानुग्रह अनुदान व पीक नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही शासन स्तरावरून वेगाने सुरु आहे, अशीही माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.



