मेढा वनविभागाची कारवाई; विनापरवाना खैर वृक्षतोड प्रकरणी तिघे ताब्यात
मेढा : जावळी तालुक्यातील डांगरेघर येथील मालकी क्षेत्रात विनापरवाना खैर वृक्षतोड करून त्याची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार वनविभागाच्या कारवाईत उघडकीस आला. या प्रकरणी वनविभागाने तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. कारवाई दरम्यान खैर वाहतूक करणारे वाहन MIH-02-BG-9784 तसेच मोटार सायकल (युनीकॉन) वाहन क्र. MH-14-BU-959 जप्त करण्यात आली आहे.
दि. 25 ऑक्टोबर 2026 रोजी मा. उपवनसंरक्षक अमोल सातपुते, तसेच मा. उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील (अति. कार्यभार) आणि मा. सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक रात्रगस्त घालत होते. यावेळी मेढा वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ मेढा अंतर्गत केळघर नियतक्षेत्रातील डांगरेघर येथे ही कारवाई करण्यात आली.
मेढा वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष पाटील यांच्या समवेत वनपाल मेढा, श्री. मारुती माने, वनरक्षक श्री.टी.एस. केळगणे, श्री.ए.बी. कोळी, श्री.एन.व्ही. वासुदेव, श्री.व्ही.एस. लांडगे तसेच वनसेवक यांनी कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणात अमीर लक्ष्मण बातचीम (रा. चिपळूण, जि.रत्नागिरी), दत्तात्रय वसंत सुर्वे (रा.डांगरेघर, ता. जावळी, जि. सातारा) आणि सूरज जयवंत पवार (रा. केळघर, ता. जावळी, जि. सातारा) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. खैर वृक्षतोड व वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी घेतली होती का, तसेच या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पुढील तपास वनपाल मेढा श्री. मारुती माने हे करीत आहेत.जावली तालुक्यातील लोकांना आवाहन करण्यात येते की, शेतकरी व लाकूड व्यावसायिक यांनी वनविभागाची रितसर परवानगी घेऊनच मालकी वृक्षतोड प्रकरणे करण्यात यावीत. अन्यथा वन कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन श्री. संतोष पाटील, वनक्षेत्रपाल मेढा यांनी केले आहे.



