ऊसतोड हंगामात सतर्क राहा; मानव-वन्यजीव संघर्ष टाळा
वनपाल राजाराम काशीद यांचे आवाहन; पुसेगाव वनपरिमंडळात जनजागृती अभियान
पुसेगाव : खटाव तालुक्यात २०२६-२७ चा ऊसतोड हंगाम सुरू झाला असून, ऊसशेती व शिवारात बिबट्या, तरस, कोल्हा यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनपाल राजाराम काशीद यांनी केले आहे.
वन विभाग सातारा, वनपरिक्षेत्र वडूज आणि वनपरिमंडळ पुसेगाव यांच्या वतीने ऊसतोड कामगार, शेतकरी व ग्रामस्थांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. बैठका व ग्रामसभांच्या माध्यमातून वन्यप्राण्यांपासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच, तातडीच्या संपर्कासाठी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले असून, व्हॉट्सॲप ग्रुपद्वारेही आवश्यक सूचना दिल्या जात आहेत.
या अभियानात वनपाल राजाराम काशीद यांच्यासह वनरक्षक गौतम सोनकांबळे, रुपाली माने, संतोष काळे व वनसेवक सहभागी आहेत.“मानव-वन्यजीव संघर्षातून जीवितहानी टाळण्यासाठी सतर्कता आणि सहजीवन आवश्यक आहे. वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाऊ नये किंवा त्याला डिवचू नये. तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा,” असे आवाहन वनपाल काशीद यांनी केले आहे.



