Home » Uncategorized » सण-उत्सवांत ध्वनी प्रदूषणावर आळा घालणे ही काळाची गरज : विद्यानंद बापट

सण-उत्सवांत ध्वनी प्रदूषणावर आळा घालणे ही काळाची गरज : विद्यानंद बापट

सण-उत्सवांत ध्वनी प्रदूषणावर आळा घालणे ही काळाची गरज : विद्यानंद बापट

लोकमान्य टिळक स्मारकात ‘ध्वनी प्रदूषण आणि सामाजिक स्वास्थ्य’ विषयावर व्याख्यान संपन्न

वाई : “सण-उत्सवाच्या काळात लादले जाणारे ध्वनी प्रदूषण हे सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक ठरू लागले आहे. सण साजरे करताना आवाजाची मर्यादा पाळून विवेकाचा आवाज बुलंद करणे आणि व्ही. डी. देसाई समितीच्या शिफारशींनुसार ध्वनी प्रदूषणावर कडक आळा घालणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे,” असे प्रतिपादन विद्यानंद बापट (पुणे) यांनी केले.

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त वाई येथील ‘संविधान प्रेमी व समविचारी संघटना’ यांच्या वतीने ‘जागर प्रबोधनाचा, चला विवेकाचा आवाज बुलंद करूया, सण-उत्सव साजरा करताना विवेक सांभाळूया’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत गुरुवारी सायंकाळी लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या रमेश गरवारे सभागृहात ‘ध्वनी प्रदूषण आणि सामाजिक स्वास्थ्य’ या विषयावर व्याख्यान पार पडले. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बापट बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर उपस्थित होते. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कॉम्रेड विशाल सपकाळ व प्रणित मोरे यांच्या हस्ते विद्यानंद बापट यांचा, तर प्रा. डॉ. भानुदास आगेडकर व कॉम्रेड धनराज कांबळे यांच्या हस्ते अध्यक्ष डॉ. नीरज हातेकर यांचा सत्कार करण्यात आला.

नागरिकांना ‘सक्तीचे श्रोते’ बनवणे अयोग्य

व्याख्यानात पुढे बोलताना विद्यानंद बापट म्हणाले, “सण-उत्सवात नागरिकांवर ध्वनीची दहशत असणे पूर्णपणे अयोग्य आहे. खुल्या वातावरणात मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवून नागरिकांना ‘सक्तीचे श्रोते’ बनवले जात असल्याचा स्पष्ट ठपका सर्वोच्च न्यायालयाने ठेवला आहे. सध्याच्या काळात आवाजाची मर्यादा ओलांडली जात असल्याने ध्वनी प्रदूषणाच्या भीतीने नागरिकांना शहरांतून ‘सक्तीचे स्थलांतर’ करावे लागत आहे. ‘उत्सव म्हणजे ध्वनी प्रदूषण’ असे चुकीचे समीकरण समाजात तयार होणे चिंताजनक आहे.”

देसाई समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी

ध्वनी प्रदूषणावर ठोस उपाय सुचवताना बापट यांनी १९८३ च्या व्ही. डी. देसाई समितीच्या शिफारशींचा संदर्भ दिला. “इमारतीच्या किंवा सभागृहाच्या बाहेर रस्त्यावर लाऊडस्पीकर लावण्यास पूर्ण बंदी असावी; स्पीकर केवळ वास्तूच्या आत आणि उपस्थित श्रोत्यांपुरतेच मर्यादित असावेत. या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी झाल्यासच नागरिकांना दिलासा मिळेल,” असे ते म्हणाले.

सार्वजनिक ठिकाणी मोबाईलवर गाणी किंवा व्हिडिओ ऐकताना वैयक्तिक हेडफोन वापरणे, शांतता क्षेत्राबाबत (Quiet Zones) नियमांचे पालन करणे, वाहतुकीला अडथळा आणणारे मंडप टाळून उत्सवांसाठी सार्वजनिक मैदाने उपलब्ध करून देणे आणि कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करणे, अशा विविध उपायांवरही त्यांनी भर दिला.

न्यायालयीन निर्णयांचा दाखला

बापट यांनी सांगितले की, उत्सव साजरा करताना अनेकदा धर्मस्वातंत्र्याची ढाल घेतली जाते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘सुमोटो’ निर्णयानुसार बीएनएस २७० (आयपीसी २६८) अंतर्गत ध्वनी प्रदूषणावर कडक कारवाईचे निर्देश आहेत. तसेच ‘चर्च ऑफ गॉड इंडिया विरुद्ध के. के. आर. कॉलनी’ या सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्याचा दाखला देत, जे सर्वसामान्य माणसासाठी गरजेचे नाही ते त्यांच्यावर लादता येणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

ध्वनी प्रदूषणाचा पशुपक्ष्यांनाही मोठा फटका : डॉ. नीरज हातेकर

अध्यक्षीय भाषणात डॉ. नीरज हातेकर यांनी भावना दुखावण्याच्या सामाजिक मानसिकतेची चिकित्सा केली. बेंदराचा सण आणि बैलगाडा शर्यतींचे उदाहरण देत ते म्हणाले, “शर्यती किंवा मिरवणुकांच्या वेळी प्राण्यांच्या अगदी मागे प्रचंड आवाजात लाऊडस्पीकर लावले जातात. या आवाजामुळे प्राण्यांच्या कानांच्या रचनेवर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांनाही या ध्वनी प्रदूषणाचा मोठा फटका सहन करावा लागतो.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भानुदास आगेडकर यांनी केले. समाजात विवेकी विचारांची पेरणी करणे आणि विविध प्रदूषणांचे दैनंदिन जीवनावरील घातक परिणाम अधोरेखित करणे हा या व्याख्यानाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद भिसे यांनी केले, तर आभार सुषमा मोरे यांनी मानले. या प्रसंगी वाई शहरातील नागरिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket