धन्वंतरी पतसंस्था – ३७ वर्षांची विश्वासाची परंपरा !
सातारा -सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेचा आज ३७ वा वर्धापनदिन ! आजवरच्या वाटचालीत त्यांनी काळानुरुप केलल्या सुधारणा, आव्हानांचा केलेला सामना, स्पर्धेत टिकवून राहण्याची क्षमता, नियोजन, काटकसर आणि अथक परिश्रम यामुळे गाठलेले प्रगतीचे उत्तुंग शिखर त्या निमित्ताने या प्रवासाचा घेतलेला आढावा….
सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेची स्थापना १६ ऑक्टोबर १९८९ रोजी झाली. याच दरम्यान अनेक सहकारी पतसंस्था, बँका स्थापन झाल्या. साधारण ३७ वर्षाच्या काळात धन्वंतरी पतसंस्थेने आपले अस्तित्व शाबूत ठेवून ते दिवसेंदिवस वृद्धिंगत ठेवत राज्याच्या सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवत प्रगतीची घोडदौड सुरू ठेवली आहे. संस्था चालवणे तुलनेने सोपे आहे परंतु संस्थेचा पाया मजबूत करत सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विचारभिन्नता असलेल्या लोकांना सहकाराचा, आर्थिक बचतीचा विचार करण्यास प्रवृत्त करून त्यांना व त्याचबरोबर संस्थेलाही प्रगतीच्या प्रवाहात सहजगत्या आणण्याचे महत्वाचे कार्य धन्वंतरी पतसंस्थेने करून दाखविले आहे. याच उददेशाने व प्रेरणेने धन्वंतरी पतसंस्थेचे संस्थापक व मुख्य प्रवर्तक डॉ. रवींद्र भोसले यांनी त्यांचे एकनिष्ठ सहकारी स्व. डॉ.क. श्री. लाहोटी, डॉ. कांत फडतरे, डॉ. शिरीष भोईटे, डॉ. अरविंद काळे, डॉ. शकील अत्तार व इतर सहकारी यांना बरोबर घेवून ३७ वर्षापूर्वी धन्वंतरी पतसंस्थेची स्थापना केली. सुरुवातीचे रू. ६१,७०० ते आजचे रू. २८५ कोटी असा संस्थेच्या भांडवलाचा प्रवास हा प्रगतीचा आलेख दर्शविणारा आहे. २५१ सभासदांवर सुरू झालेली पतसंस्था आजमितीस १५,०५६ इतके सभासद एकविचाराने व एकदिलाने संस्था हिताच्या दृष्टीने काम करत आहेत.
आज अखेर संस्थेकडे २०४ कोटीपेक्षा जास्त ठेवी आहेत. पारदर्शक कामकाजाची पध्दत अनुसरल्याने संस्थेची वाटचाल गत सदतीस वर्षात लक्षवेधी ठरली आहे. स्पर्धात्मक युगात पतसंस्था बळकट व्हाव्यात म्हणून शासनाने त्यांचे निकषाप्रमाणे गुणांवर आधारित ऑडिटची पद्धत लागू केली. यामध्ये धन्वंतरी पतसंस्था स्थापनेपासूनच प्रत्येक वर्षी सर्वोच्च ऑडिट वर्ग ‘अ’ मिळवित आहे. काळ बदलत गेला तसे शासनाचे नियंत्रण कडक होत गेले. त्याचाच एक भाग म्हणजे एन.पी.ए.चे निकष लागू झाले. आज अखेर पतसंस्थेने १००% एन.पी.ए. ची तरतूद केलेली असून संस्थेने आपला नेट एनपीए ०% राखला आहे. सातारा शहरात शनिबार पेठ ब सदरबझार तसेच कोरेगांव, फलटण, कराड व पुणे जिल्ह्यात धनकवडी व पिंपरी चिंचवड या ठिकाणी शाखा कार्यरत असून तिच्या सहा शाखा व मुख्य कार्यालय स्ववास्तूत कार्यरत आहेत.
सर्व पतसंस्थांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देणारी एकमेव पतसंस्था असून इतर बँकाप्रमाणे आपल्या संस्थेनेही ग्राहकांना डिजिटल सेवा द्यावी तसेच त्यांचे व्यवहार सुलभ व त्वरित व्हावेत हा हेतू मनात ठेवून मा. संचालक मंडळाने अत्याधुनिक ऑनलाईन सीबीएस संगणक प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला. सदर सीबीएस प्रणाली सतत म्हणजेच २४ तास विनाखंड कार्यरत रहावी याकरीता आधुनिक फायबर इंटरनेट, युपीएस, जनरेटर इ. बाबीही संस्थेमध्ये कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. आधुनिक प्रणालीमुळे संस्थेच्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, ऑनलाईन बँकिंग, मोबाईल अॅप्लिकेशन, इ. सुविधा विनासायास मिळत आहेत. संस्थेचे ग्राहक स्वतःच्या बँक खात्यातून संस्थेच्या खात्यामध्ये रक्कम एनईएफटी, आयएमपीएस, आरटीजीएस द्वारे व्यवहार करू शकतात, तसेच थोड्याच दिवसात विविध बँकिंग अॅप उदा. जीपे, फोनपे, पेटीएम द्वारेही संस्थेचे खात्यामध्ये रक्कम जमा होतील. अशा प्रकारे डिजिटल धन्वंतरीचे स्वप्न पूर्ण करताना आपणा सर्वांना विशेष आनंद होत आहे. तसेच सातारा शाखेच्या ठिकाणी सुरक्षित लॉकर्स सुवीधाही अल्पदरात मिळत आहे.
संस्थेकडे वसूल भागभांडवल रु. ११ कोटीचे वर तसेच ठेवी रु. २०४ कोटीच्या वर आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे ठेवीदारांचा संस्थेवर असलेला प्रचंड विश्वास तसेच सदर भांडवलातून संस्थेने रु. १५९ कोटीचेवर कर्जवाटप केले आहे. तसेच रु. ११३ कोटीचे वर सुरक्षित व उत्तम बँकामध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच निव्वळ एन.पी.ए. चे प्रमाणही ०% राखले आहे. सहकार क्षेत्रामधील विविध नामांकित संस्था तसेच शासनाच्या सहकार विभागाकडून वेळोवेळी एकूण ३० पुरस्कारांनी सन्मानित झालेली एकमेव धन्वंतरी पतसंस्था आहे याचा सार्थ अभिमान आपणा सर्वांना आहे. मा. संचालक मंडळाने मार्च २०२७ अखेर ५०० कोटीचा व्यवसाय करण्याचा संकल्प केला आहे ही कौतुकाची गोष्ट आहे. संस्थेच्या या यशामागे संस्थापक संचालकांसह, माजी संचालक, विद्यमान संचालक, आजी माजी सेवक यांचे निस्पृह योगदान आहे. संस्था आपल्या ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे देत असलेल्या सेवेमुळे दिवसेंदिवस ग्राहक वर्ग वाढत आहे. बँकिंग सेवा हा प्रत्येक सेवकाचा रोजच्या जगण्याचा, जीवनशैलीचा भाग असला पाहिजे अशी धन्वंतरी पतसंस्थेची भूमिका आहे. त्याचबरोबर संचालक मंडळ व इतर समितीच्या होत असलेल्या सभांमध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण व संस्थेचे हित समोर ठेवून सखोल चर्चा होवून निर्णय घेतले जातात व त्याच्या अंमलबजावणीकडेही काळजीपूर्वक लक्ष दिले जाते यामुळे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. धन्वंतरी पतसंस्थेची प्रगतीची घोडदौड महाराष्ट्र राज्यात ज्यांनी होमिओपॅथी क्षेत्रात तपस्वी वृत्तीने कार्य केलेले व राज्य सहकारी पतसंस्थांचे फेडरेशनचे संचालकपदी कार्यरत असलेले असे धन्वंतरी पतसंस्थेचे संस्थापक व चेअरमन डॉ. रवींद्र भोसले यांच्या प्रभावी, सक्षम व अभ्यासू नेतृत्वाखाली सुरू आहे. तसेच संस्थापक संचालक व विद्यमान व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे हे देखील सातारा जिल्हा पतसंस्थांचे फेडरेशनच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत तसेच संस्थापक संचालक डॉ. अरविंद काळे, डॉ. शिरीष भोईटे, डॉ. शकील अत्तार हे सुद्धा अनेक सामाजिक संस्थांवरती विविध पदावर कार्य करत आहेत.
संस्थेला यापूर्वी संस्थापक संचालक कै. डॉ. क. श्री. लाहोटी यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. याचबरोबर माझे सोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीहरी डिंगणे आमच्या इतर सहका-यांसोबत आम्ही आजमितीस संस्थेच्या व्यवस्थापनाची धुरा मा. संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली समर्थपणे सांभाळत आहेत. वरील संस्थापक संचालकांच्यासह इतर सहकारी संचालक डॉ. हेमंत शिंदे, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. अभिजित भोसले, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. जयदीप चव्हाण, डॉ. सौ. सारिका मस्कर, डॉ. सौ. हर्षला बाबर, डॉ. नारायण तांबे, डॉ. सुनील कोडगुले, अॅड. सूर्यकांत देशमुख तसेच सल्लागार, हितचिंतक, व सेवक वर्गाचा मोलाचा सहभाग आहे.
कोणत्याही संस्थेबरोबर आर्थिक व्यवहार करताना सदर संस्थेचे संचालक, नेतृत्व करणारी व्यक्ती यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे अवलोकन करूनच लोक व्यवहार करत असतात. त्याचप्रमाणे डॉ. रवींद्र भोसलेसर यांच्या रोजच्या वागण्यातील सहजता, सर्वाप्रती व्यक्त होणारा स्नेहभाव सर्वांना सामावून घेण्याची सामूहिकता, पारदर्शी व निरपेक्ष पद्धतीचे कामकाज व याच प्रकारचे सर्व संचालक असल्यामुळे सभासदांचा संस्थेवर असलेला प्रचंड विश्वास हा सुध्दा संस्थेच्या यशाचा महत्वाचा भाग आहे यामुळेच धन्वंतरी पतसंस्थेने आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे. यामुळेच राज्य शासनाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांकाचा सहकार भूषण पुरस्कार देऊन संस्थेस मा. राज्यपाल यांच्या हस्ते गौरविले आहे. ही सर्व सभासदांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे.
सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने संस्थेने सभासदांना मोफत वाचनालय व विविध समारंभासाठी धन्वंतरी हॉल इ. गोष्टी सुरू केल्या आहेत तसेच संस्थेच्या भविष्यातील वाटचालीत कार्यक्षेत्रामध्ये निवडक जिल्हयात शाखा विस्तार करणे, प्रशस्त अशी प्रशासकीय इमारत उभारणे तसेच महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा सहकार महर्षी पुरस्कार मिळविणे अशी अनेक महत्त्वाकांक्षी उद्दीष्टे मा. संचालक मंडळासमोर आहेत. ही उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ कृतिशील असून संस्थेच्या प्रगतीचा आलेख यापुढेही उंचावत ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. पारदर्शक व्यवहार जपणारी, ग्राहकांना केंद्रबिंदू मानून त्यांना विनम्र व सोयीची सेवा देणारी तसेच सहकाराच्या तत्वांनुसार व समर्पित वृत्तीने काम करणारे मा. संचालक मंडळ व सेवक वर्ग यामुळेच आज संस्थेने अभिमानास्पद अशी ३७ वर्षांची विश्वासापूर्ण यशाची परंपरा निर्माण केली आहे. यापुढेही आपणा सर्वांचे सहकार्य, सहभाग असाच मिळत राहो ही धन्वंतरी चरणी प्रार्थना.
संस्थेच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्ताने आज संस्थेच्या मुख्य कार्यालयात सकाळी ९ ते २ पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून सायं. ४ वाजता सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या सभासदांना धन्वंतरी गौरव सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे. जय सहकार !
श्री. संजय यादवराव पवार,
मुख्य कार्यकारी अधिकारी, सहकार भूषण धन्वंतरी नागरी सह. पतसंस्था मर्या., सातारा.





