Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पुसेगाव वनपरिमंडळात श्रमदानातून उभारले १० वनराई बंधारे; जलसंधारणासाठी वन विभागाचा पुढाकार

पुसेगाव वनपरिमंडळात श्रमदानातून उभारले १० वनराई बंधारे; जलसंधारणासाठी वन विभागाचा पुढाकार

पुसेगाव वनपरिमंडळात श्रमदानातून उभारले १० वनराई बंधारे; जलसंधारणासाठी वन विभागाचा पुढाकार

लोकसहभागातून पाणी अडवण्याचा प्रयत्न; संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपक्रम

पुसेगाव, प्रतिनिधी : खटाव तालुक्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने पुसेगाव वनपरिमंडळातील वनक्षेत्रात वन विभागाच्या वतीने श्रमदानातून वनराई बंधारे उभारण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आजअखेर १० वनराई बंधारे श्रमदानातून पूर्ण करण्यात आले आहेत.

तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस, भूजल पातळीत झालेली घट, जलस्रोतांमधील अपुरा पाणीसाठा आणि जमिनीतील कमी झालेला ओलावा यामुळे संभाव्य टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनांनुसार वनक्षेत्रातील नैसर्गिक जलस्रोतांचा विचार करून ठरावीक अंतरावर साखळी पद्धतीने वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत.

या उपक्रमात वनपाल, वनरक्षक, वनसेवक, शालेय विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक सहभागी होत असून, श्रमदानातून जलसंधारणाची कामे केली जात आहेत. पावसाचे पाणी अडवणे, त्याचा जमिनीत मुरण्यास मदत करणे आणि मृदाक्षय रोखणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

बदलत्या हवामानामुळे पावसाचे अनियमित प्रमाण, भूजल पुनर्भरण क्षमतेतील घट आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाई या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत वनराई बंधाऱ्यांमुळे पाण्याचा साठा टिकवून ठेवण्यास आणि भूजल पुनर्भरणास मदत होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर जलसंधारणाबाबत जनजागृती होऊन नागरिकांमध्ये श्रमदानाची भावना आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढण्यासही हातभार लागत आहे.

जलसंधारणाच्या या सामूहिक उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.सातारा जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार, उपवनसंरक्षक (प्रादेशिक) अमोल सातपुते, वनसंरक्षक दिगंबर जाधव आणि वनाधिकारी नितीन आटपाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. याबाबतची माहिती वनपाल राजाराम काशीद यांनी दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket