पावसाअभावी फुलांचा बहर कमी; कास पुष्प पठाराचा या वर्षीचा पर्यटन हंगाम आजपासून बंद
सातारा प्रतिनिधी –जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या कास पुष्प पठारावर यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण व दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नैसर्गिक रानफुलांचा अपेक्षित बहर आलेला नाही. पावसाअभावी फुलांच्या वाढीवर व फुलोऱ्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याने यंदाचा पुष्प हंगाम अपेक्षेप्रमाणे बहरू शकलेला नाही.
या पार्श्वभूमीवर, कास पुष्प पठाराचा सन २०२६ मधील पर्यटन हंगाम दि. १३ ऑक्टोबर २०२६ पासून बंद करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांनी याची नोंद घेऊन नियोजित भेटीचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन सातारा वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
कास पठार हे जैवविविधतेने समृद्ध आणि दुर्मिळ रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेले संवेदनशील नैसर्गिक क्षेत्र आहे. या परिसरातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. निसर्गातील बदलत्या परिस्थितीचा आदर करून पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी वन विभागास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.
— वनपरिक्षेत्र अधिकारी मेढा




