मानव-बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी पुसेगाव परिमंडळात जनजागृती मोहीम
पुसेगाव : मानव-बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी तसेच बिबट्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पुसेगाव वनपरिक्षेत्रातील परिमंडळात वन विभागाच्या वतीने व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
नितीन आटपाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजाराम काशीद, वनरक्षक संतोष काळे, गौतम सोनकांबळे व रुपाली माने यांच्याकडून प्राथमिक व माध्यमिक शाळा, ग्रामसभा, वाड्या-वस्त्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच बिबट्याचा वावर असलेल्या भागात रात्रीची गस्तही घालण्यात येत आहे.
यावेळी वनपाल राजाराम काशीद नागरिकांना बिबट्याची जीवनशैली, अन्नसाखळीतील त्याचे महत्त्व, मानव-वन्यजीव संघर्षाची कारणे व परिणाम तसेच संघर्ष टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देत आहेत. बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे.
शेतात जाताना सोबत राहण्याचे आवाहन
शेतात जाताना एकट्याने न जाता सोबत कोणाला तरी घेऊन जावे. हातात घुंगरू लावलेली काठी ठेवावी, मोबाईलवर संगीत लावून आपली उपस्थिती वन्यप्राण्यांच्या लक्षात आणून द्यावी तसेच अधूनमधून आवाज देत राहावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे. वाकून अथवा बसून काम करताना आजूबाजूला विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
लहान मुलांकडे विशेष लक्ष द्या
बिबट्याचे नैसर्गिक खाद्य शेळी, मेंढी, वासरू, कालवड, कुत्रे, माकड, कोंबड्या आदी प्राणी आहेत. लहान मुले वाकून अथवा बसून खेळत असताना बिबट्याला त्यांची हालचाल प्राण्यासारखी भासू शकते. त्यामुळे बिबट्याचा वावर असलेल्या भागात लहान मुलांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे वन विभागाने सांगितले.
बिबट्या दिसल्यास वन विभागाला तात्काळ कळवा
बिबट्या सामान्यतः माणसाला टाळतो. त्यामुळे गावाच्या परिसरात बिबट्या दिसल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये किंवा त्याच्या जवळ जाऊन गर्दी अथवा गोंधळ करू नये. बिबट्या अडकलेल्या अथवा संकटात असल्याचे दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वनपाल राजाराम काशीद यांनी केले आहे.
दरम्यान, प्रत्येक ग्रामपंचायत, आधार केंद्र, प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच वाड्या-वस्त्यांवर वनपाल, वनरक्षक व वनसेवकांचे संपर्क क्रमांक असलेले फलक लावण्यात आले आहेत. नागरिकांनी वन्यप्राण्यांबाबत सतर्क राहून वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




