महाबळेश्वर नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे रखडलेले काम अखेर सुरू; नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना यश
महाबळेश्वर:महाबळेश्वरवासीय आणि येथे येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष लागून राहिलेल्या महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या नूतनीकरणाचे काम अखेर प्रत्यक्ष सुरू झाले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अर्धवट आणि प्रलंबित असलेल्या या इमारतीला आता नवे रूप मिळणार असून, एक भव्य व आधुनिक प्रशासकीय वास्तू लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील आणि सर्व नगरसेवकांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामातील सर्व तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर झाल्या असून, बांधकामाला पूर्ण क्षमतेने गती मिळाली आहे.
अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली
नगरपालिकेची जुनी इमारत प्रशासकीय कामकाजाचा विस्तार पाहता अपुरी पडत असल्याने नवीन भव्य इमारतीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, विविध तांत्रिक अडचणी, निधीची टंचाई व इतर कारणांमुळे हे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या महाबळेश्वर शहराच्या मध्यवर्ती भागात ही इमारत अर्धवट स्थितीत पडून राहिल्याने स्थानिक नागरिकांमधूनही सातत्याने चिंता व्यक्त केली जात होती.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा यशस्वी पाठपुरावा
या प्रलंबित प्रकल्पाची गांभीर्याने दखल घेत नगराध्यक्ष सुनील शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील व सर्व नगरसेवकांनी शासन दरबारी विशेष प्रयत्न केले. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध शासकीय विभागांच्या परवानग्या मिळवणे, निधीचा मार्ग मोकळा करणे आणि तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी भगीरथ प्रयत्न केले. अखेर या प्रयत्नांना यश आले असून सर्व आवश्यक प्रशासकीय मंजुऱ्या मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
नव्या रूपात उभी राहणार आधुनिक वास्तू
ही नवी इमारत केवळ प्रशासकीय कार्यालय न राहता, महाबळेश्वरच्या वैभवात भर घालणारी एक देखणी वास्तू ठरणार आहे. या इमारतीमध्ये:
▪️नागरिकांसाठी आधुनिक सोयी-सुविधा
▪️विविध विभागांची सुसज्ज कार्यालये
▪️प्रशस्त सभागृह
▪️सुसज्ज पार्किंग व्यवस्था
यामुळे नगरपालिकेचा कारभार अधिक गतिमान होईल आणि नागरिकांना एकाच छताखाली सर्व प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करून मिळतील.
”महाबळेश्वर नगरपालिकेची ही इमारत शहराची एक मुख्य ओळख आहे. हे काम अनेक वर्षे रखडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. परंतु, आम्ही सर्व नगरसेवकांनी आणि सहकाऱ्यांनी घेतलेल्या कष्टामुळे आणि पाठपुराव्यामुळे आज हे काम सुरू होत असल्याचा मनस्वी आनंद आहे. महाबळेश्वरच्या जनतेला दर्जेदार सुविधा देणारी ही वास्तू लवकरात लवकर पूर्ण व्हावी, हाच आमचा प्रयत्न आहे.”
— सुनील शिंदे, नगराध्यक्ष, महाबळेश्वर नगरपालिका.
इमारतीचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्यामुळे महाबळेश्वरमधील स्थानिक नागरिक, व्यापारी आणि राजकीय वर्तुळातून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत असून, नगराध्यक्ष सुनील शिंदे व सर्व नगरसेवकांचे विशेष आभार मानले जात आहेत.




