महिला सफाई कामगाराशी लैंगिक स्वरूपाची टिप्पणी केल्याच्या आरोपावरून महाबळेश्वर पालिका अधिकाऱ्यावर गुन्हा
महाबळेश्वर : वेण्णा लेकजवळील माखरिया गार्डन येथे कार्यरत ३६ वर्षीय महिला सफाई कामगाराने केलेल्या तक्रारीवरून महाबळेश्वर नगरपालिकेचे अधिकारी कल्याण बाजीराव हिवरे यांच्याविरुद्ध लैंगिक छळ व महिलेच्या लज्जेला धक्का पोहोचवणाऱ्या कृत्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, १८ ऑगस्ट रोजी माखरिया गार्डन येथे काम सुरू असताना हिवरे यांनी महिलेशी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा तसेच अश्लील हावभाव व धमकी दिल्याचा आरोप आहे. घटनेनंतर महिलेने पालिका प्रशासनाकडे तक्रार केल्याचे सांगण्यात येते. मात्र, कारवाई न झाल्याने ७ ऑक्टोबर रोजी तिने महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७५(१)(iv) आणि ७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




