महाबळेश्वरचे लोकप्रिय नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते ‘मीडिया सेवन’च्या गणेश आरती संग्रहाचे प्रकाशन
महाबळेश्वर : सातारा न्यूज मीडिया सेवन (Digital and Publication) यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘गणेश आरती संग्रह २०२६’चे प्रकाशन महाबळेश्वरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी युवा नगरसेवक रोहित ढेबे, पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
धार्मिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरांचे जतन व्हावे, तसेच विविध देवदेवतांच्या आरत्या सर्वसामान्य भाविकांना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ‘मीडिया सेवन’च्या वतीने ‘आरती संग्रह २०२६’ प्रकाशित करण्यात आला आहे. या संग्रहामध्ये विविध देवदेवतांच्या आरत्यांचा समावेश करण्यात आला असून, भाविकांसाठी हा संग्रह उपयुक्त ठरणार आहे.
आरती संग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी ‘मीडिया सेवन’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध घडामोडींना व्यासपीठ देतानाच धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे कामही मीडिया सेवनकडून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.महाबळेश्वरसारख्या पर्यटननगरीला समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली आहे.
‘मीडिया सेवन’च्या ‘आरती संग्रह २०२६’ या उपक्रमाचे नागरिक, भाविक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून स्वागत करण्यात आले. पत्रकारितेबरोबरच सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सकारात्मक योगदान देण्याचा ‘मीडिया सेवन’चा हा उपक्रम असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.




